मंत्रालयाच्या इमारतीच्या दुरुस्तीच्या कामामुळे अधिकारी व कर्मचारी हैराण झाले आहेत. ठोकाठोकीचा मोठमोठा आवाज, धुळीचे लोट आणि बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायणाच्या उग्र वासाने मळमळणे, श्वाच्छोश्वासाचे त्रास होणे, अशा तक्रारी येऊ लागल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने मंत्रालयात वैद्यकीय पथके पाठविण्याच्या सूचना जेजे रुग्णालयाला दिल्या आहेत.
गेल्या वर्षी जूनमध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगीत मुख्य इमारतीचा चौथा, पाचवा व सहावा मजला जळून खाक झाला. त्यानंतर बऱ्याच विभांगातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वर्ल्ड ट्रेड सेंटर, आरोग्य संचालनालय, जीटी रुग्णालय, जिमखाना, सिडको भवन, सार्वजनिक बांधकाम भवन, वरळी दूध डेअरी, अशा अनेक ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले. मुख्य इमारतीच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील विभाग कायम ठेवण्यात आले आहेत.  
गेल्या तीन महिन्यांपासून मंत्रालयाच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्याचा मोठमोठय़ाने होणारा आवाज, उडणारी धूळ आणि बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायणाच्या उग्र वासाचा कर्मचाऱ्यांना असह्य़ त्रास होत आहे.
विशेष करुन, तिसऱ्या मजल्यावरील वित्त आणि विधी व न्याय विभागाचे अधिकारी व कर्मचारी हैराण झाले आहेत. काही कर्मचाऱ्यांना मळमळणे, स्वाच्छोश्वासाचा त्रास होणे, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागाने कर्मचाऱ्यांना आरोग्याचा त्रास होऊ लागल्यास त्यांची लगेच तापसणी करुन उपचार करण्यासाठी जेजे रुग्णलयांच्या डॉक्टरांची दोन पथके पाठवावीत अशा सूचना दिल्या आहेत.
कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल दुरुस्तीच्या कामाचा त्रास होऊ लागल्याने कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळतही बदल करण्याचे ठरविण्यात आले आहे. वित्त आणि विधी व न्याय विभागांतील कर्मचाऱ्यांनी कार्यालयात एक तास आधी यावे व एक तास लवकर जावे, असे पत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने काढले आहे.