मुंबई : दोन दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या खरेदीनिमित्त रविवारी बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या होत्या. स्थानिक दुकानदारांपासून ते मोठय़ा बाजारपेठांपर्यंत सकाळपासूनच ग्राहकांची झुंबड उडाली होती. त्याचवेळी मुखपट्टी आदी करोना निर्बंधांच्या पालनासाठी प्रशासन आणि पोलिसांना कसरत करावी लागत आहे.

दादर बाजारपेठेत तर खरेदीला उधाण आले होते. मुंबईच्या वेगवेगळ्या भागांतील नागरिक येथे खरेदीसाठी येतात. स्थानक परिसर, किर्तीकर मार्केट, रानडे रोड आणि आसपासच्या परिसरात माणसांची दाटी झाली होती. कंदील, तोरण, रांगोळ्या, रंग, दिव्यांच्या माळा, पितळी वस्तू, सजावटीचे साहित्य घेऊन बसलेल्या फेरीवाल्यांना ग्राहकांपासून उसंत मिळत नव्हती. कपडे, साडय़ांची दुकाने गजबजली होती. नागरिकांमध्ये खरेदीचा प्रचंड उत्साह, आनंद दिसत होता.

करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक मुखपट्टी आदी नियमांचे पालन करतील याकडे पोलिसांचे विशेष लक्ष होते. फेरीवाल्यांनी बाजारपेठांतून टांगलेले कंदील, दीपमाळा, तोरणे आणि उत्साहाने खरेदी करणारे ग्राहक असे चित्र होते.  फुलबाजारात मात्र जेमतेम प्रतिसाद होता. लक्ष्मीपूजनाला अजून तीन दिवस बाकी असल्याने फुलांना फारशी मागणी नव्हती. 

पोलिसांकडून दक्षता

शिवाजी पार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश कसबे यांनी सांगितले की, रविवारी खरेदीसाठी गर्दी होणार याचा अंदाज घेऊन बंदोबस्त ठेवला होता. नागरिक खरेदी व्यतिरिक्त रस्त्यांवर रेंगाळणार नाहीत यांची दक्षता घेतली. स्थानक परिसर, रानडे रोड, कबुतरखाना, बाजारपेठेतील सर्व गल्लय़ा पोलिसांच्या देखरेखीखाली होत्या. सायंकाळी ५ वाजता गर्दी वाढली, परंतु तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. सर्व अंमलदार, अधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली. वाहतूक पोलिसांनीही सेनाभवन ते कबुतरखाना दरम्यान विशेष बंदोबस्त लावला होता.