मोठय़ा पडद्यावरील ‘शहेनशाह’ अमिताभ बच्चन छोटय़ा पडद्यावर आले, त्या वेळी मोठय़ा पडद्यावर काम करणाऱ्या अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. चित्रवाणीवर काम करणे कमीपणाचे मानणाऱ्या या सगळ्यांना अमिताभ बच्चन यांनी आपल्या संयत आणि शैलीदार सूत्रसंचालनाने चांगलीच चपराक दिली आणि ‘कौन बनेगा करोडपती’ या रिअ‍ॅलिटी शोने लोकप्रियतेचा इतिहास घडवला. आता या हिंदी रिअ‍ॅलिटी शोचा मराठी अवतार, ‘कोण होईल मराठी करोडपती?’ उन्हाळ्यात ई-टीव्हीवरून प्रसारित होणार आहे. मात्र या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांच्या जागी सूत्रसंचालन कोण करणार, याबाबत अद्याप निर्णय न झाल्याचे ई-टीव्हीच्या सूत्रांनी सांगितले.
सोनी पिक्चर्स टेलिव्हिजन या कंपनीकडून ई-टीव्हीने ‘कौन बनेगा करोडपती’चे ‘फॉरमॅट हक्क’ विकत घेतले आहेत. मराठी दर्शकांना अतिभव्य अनुभव देण्यासाठी ई-टीव्हीने बिग सिनर्जी या कंपनीसह भागिदारीही केली आहे. जगभर गाजलेल्या या खेळाचा मराठी अवतार आपण खास मराठी लोकांसाठी घेऊन येत आहोत, असे ई-टीव्ही मराठीच्या वास्तववादी कार्यक्रमांचे प्रमुख अमित फाळके यांनी सांगितले.
मराठी लोकांसाठी हा कार्यक्रम मराठीत आणण्याची कल्पना याआधीच आपल्या डोक्यात होती. आता ई-टीव्हीच्या माध्यमातून हा कार्यक्रम महाराष्ट्रभर पोहोचणार आहे, असे बिग सिनर्जीच्या सिद्धार्थ बसू यांनी सांगितले. दक्षिणेतील राज्यांमध्येही या कार्यक्रमाने इतिहास घडवला असून आता मराठीत कसा प्रतिसाद मिळतो, याकडे आमचे लक्ष असल्याचेही ते म्हणाले.
ई-टीव्हीने या कार्यक्रमाची घोषणा केली असली, तरीही अद्याप सूत्रसंचालनाची महत्त्वाची जबाबदारी कोण सांभाळणार, याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे समजते. मराठी चित्रपटसृष्टीतील महेश मांजरेकर, सचिन पिळगांवकर, सचिन खेडेकर, आदेश बांदेकर, अशा काही आघाडीच्या कलाकारांची नावे चर्चेत असल्याचे समजते.