नोकरभरतीच्या फसव्या जाहिरातीचा ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर सुळसुळाट   

अखेर सामान्य प्रशासन विभागाला ‘फसवणुकीपासून सावध राहण्याचे’ आवाहन लोकांना करावे लागले आहे.

WhatsApp
प्रतिनिधिक छायाचित्र

फसवणुकीपासून सावध राहण्याचे सरकारचे आवाहन

राज्य सरकारने चतुर्थश्रेणीच्या भरतीवर बंदी घातलेली असतानाही ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून नोकरभरतीच्या बोगस जाहिराती व्हायरल झाल्या आहेत. केवळ इच्छुकांकडूनच नव्हे तर मंत्रालयातील अनेक विभागांतील कर्मचाऱ्यांकडूनही विचारणा होत असल्याने सरकारी अधिकाऱ्यांची झोप उडविली आहे! अखेर सामान्य प्रशासन विभागाला ‘फसवणुकीपासून सावध राहण्याचे’ आवाहन लोकांना करावे लागले आहे. नोकरभरतीची कोणतीही जाहिरात सरकारने दिलेली नाही. त्यामुळे ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर आलेल्या मेसेजकडे दुर्लक्ष करावे. जाहिरातीमधील सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतात. नोकरभरतीसंदर्भातील जाहिरात शासनाच्या विभागाकडून दिली जात नाही, असे स्पष्टीकरण या विभागाने दिले आहे.

या पदांची भरती नाही! फक्त मुदतवाढ

विविध ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ग्रुपवर सध्या सामान्य प्रशासन विभागाच्या नावाची गट- ड वर्गातील लिपिक- ३४, सहायक रोखपाल- २२, रोखपाल- १०, लेखापाल- ०६, गोपनीय लिपिक- १९, देयक लेखापाल- १४, शिपाई- ५८, वाहनचालक- ३४, नाईक- ३१ अशी २२८ पदे सरळसेवेने भरण्याबाबतची जाहिरात फिरत आहे. जाहिरातीवर शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक- अपमु-२९१७/ प्र.क्र.४४/ १९अ, दि. १० जानेवारी २०१८ नमूद केलेला आहे व जाहिरातीखाली स्वाक्षरी केलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम ‘अध्यक्ष, निवड समिती तथा उपसचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई’ असे दाखविण्यात आले आहे. या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सामान्य प्रशासन विभाग व त्या विभागांतर्गत अन्य पाच कार्यालयांच्या आस्थापनेवरील १९५ अस्थायी पदांना २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही भरतीची जाहिरात नसून नियमित प्रशासकीय बाबीसंबंधीचा शासन निर्णय आहे, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fake job advertisement on whatsapp

ताज्या बातम्या