वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत कारवाई करण्याची धमकी देऊन कुलाब्यापासून दहिसपर्यंतची हॉटेल आणि बर मालकांकडून पैसे उकळणाऱ्या तोतया पत्रकारांच्या टोळीतील आठ जणांना पोलिसांनी शनिवारी गजाआड केले. या टोळीचा म्होरक्या मात्र अद्याप फरार आहे.
गेल्या दीड वर्षांपासून कुलाब्यापासून दहिसपर्यंतच्या विविध हॉटेल आणि बार मालकांना दमदाटी करून मोठमोठय़ा रकमा उकळण्याचा सपाटा काही अज्ञात व्यक्तींनी लावला होता. आपण पत्रकार असल्याची बतावणी करीत ही मंडळी या व्यावसायिकांना लुटत होती. विविध वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांची बोगस ओळखपत्रेही त्यांनी तयार केली होती. सागर सिंग हा या टोळीचा म्होरक्या होता. पैसे देण्यास नकार देणाऱ्या हॉटेल अथवा बार मालकाला समाजसेवा शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून कारवाई करण्याची धमकीही या टोळीकडून देण्यात येत होती. खारमधील एका व्यक्तीकडून या टोळीने ५० हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संबंधित व्यक्तीला निर्जनस्थळी नेऊन धमकावण्यात आले. घाबरलेल्या या व्यक्तीने १२ हजार रुपये देऊन आपली सुटका करून घेतली. त्यानंतर या व्यक्तीने पोलिसात तक्रार केली.
पोलिसांनी सापळा रचून या टोळीतील आठ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या टोळीने वर्सोवा येथील एका बार मालकाकडून तीन लाख रुपये उकळल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या टोळीतील सदस्य एकत्र येऊ नयेत याची काळजी सागर सिंग घेत होता. हॉटेल-बार मालकांकडून उकळलेल्या पैशांचे वाटप तोच करीत असे, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. टोळीचा म्होरक्या सागर सिंग फरार झाला असून खार पोलीस ठाण्यातील अधिकारी त्याचा शोध घेत आहेत.