कारागृहात प्रकृती खालावत असल्याचा कुटुंबीयांचा दावा

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी कवी वरावरा राव यांची प्रकृती खालावत असून त्यांना बुद्धिभ्रम झाला आहे, असा दावा करत त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

राव सध्या ८१ वर्षांचे असून त्यांना नुकतेच नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात नेण्यात आले आहे. तेथे त्यांच्या खालावणाऱ्या प्रकृतीबाबत चिंता वाटत असल्याचे त्यांची पत्नी, मुलगी आणि इतर कुटुंबीयांनी सांगितले. ‘२८ मे रोजी राव यांना जेजे रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसतानाही त्यांना तीनच दिवसांत पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले. पोलिसांच्या परवानगीने त्यांचे कुटुंबीयांशी दूरध्वनीवर बोलणे होत असताना त्यांचा आवाज क्षीण झाला होता. ते गोंधळलेले वाटत होते आणि त्यांना बोलणे जड जात होते’, असे राव यांच्या पत्नीने ऑनलाइन पत्रकार परिषदेत सांगितले.

शनिवारी राव यांच्या पत्नीने त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली असता, त्यांनी प्रश्नांची नीट उत्तरे दिली नाहीत. त्यांना नीट चालता येत नसल्याचे सहआरोपीने कुटुंबीयांना सांगितले. आपली सुटका होत असून कुटुंबीय न्यायला आले असल्याचाही भ्रम राव यांना अधूनमधून होतो.

शरीरातील पोटॅशिअमआणि सोडियमची पातळी खालावल्याने आणि इलेक्ट्रोलाइटच्या असंतुलनामुळे राव यांना स्मृतिभ्रंश आणि बुद्धिभ्रम झाल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले. तसेच तळोजा तुरुंग राव यांची वैद्यकीय स्थिती सांभाळण्यासाठी योग्य नसल्याने त्यांना चांगल्या रुग्णालयात दाखल करावे, अशीही मागणी केली.

कुटुंबीयांचे म्हणणे..

‘सध्या या प्रकरणाशी संबंधित सत्य बाबींपेक्षाही राव यांची प्रकृती अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे अथवा आवश्यक ती वैद्यकीय सुविधा तुरुंगात उपलब्ध करावी’, अशी मागणी कुटुंबीयांनी केली. तसेच कोणत्याही व्यक्तीला अशाप्रकारे जगण्याचा हक्क नाकारण्याचा अधिकार सरकारला नाही, असेही कुटुंबीयांनी सांगितले. एल्गार परिषदप्रकरणी अटक झाल्यानंतर गेले २२ महिने राव तुरुंगात आहेत.