scorecardresearch

अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; वडील आणि भाऊ यांना अटक

पीडित मुलीने तिच्या शिक्षकांना हा प्रकार सांगितला. त्यामुळे हा प्रकार उघड झाला.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई: धारावी येथे वडील व मोठय़ा भावानेच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. आरोपी वडील गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर अत्याचार करत असून भावानेही दोन वर्षांपूर्वी तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडित मुलीने तिच्या शिक्षकांना हा प्रकार सांगितला. त्यामुळे हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी धारावी पोलिसांनी आरोपी भाऊ व पित्याला सोमवारी अटक केली.

हा प्रकार २०१९ पासून आतापर्यंत सुरू होता. याबाबत मुलीने विश्वासाने तिचे शिक्षक व मुख्याध्यापकांना या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी तिला मानसिक आधार दिल्यानंतर मुलीने या प्रकरणी धारावी पोलिसांकडे तक्रार केली त्यानुसार धारावी पोलिसांनी ४३ वर्षीय पिता व २० वर्षांच्या भावाला अटक केली. तक्रारदार मुलगी १६ वर्षांची असून दोन वर्षांपूर्वी ती बॅग बनवण्याच्या कारखान्यात झोपली असताना आरोपी पित्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. तसेच २५ जानेवारी, २०१९ मध्ये पीडित मुलगी घरी झोपली असताना आरोपी भावाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार तिने केली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३७६(२)(फ), ३७६(२)(न), ३४ सह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा कलम ४, ६, ८, १०, १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आरोपी पिता व भावाला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत पाटील यांनी दिली. शीव रुग्णालयात मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Father brother arrested for molesting minor girl zws

ताज्या बातम्या