गेल्या काही महिन्यांमध्ये कांदिवलीमधील न्यू लिंक रोडवरील लालजीपाडालगतच्या खाडीमध्ये मोठय़ा प्रमाणावर भराव टाकल्यामुळे पोयसर नदीचा मार्ग कोंडला गेला आहे. अल्पावधीतच भरणी भागावर गॅरेजेस उभी राहिली आहेत. पोयसर नदी खाडीमध्ये विलीन होते तेथेच भरणी झाल्यामुळे येत्या पावसाळ्यात लालजीपाडा आणि आसपासच्या वस्त्या पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पालिका अधिकाऱ्यांनी अलीकडेच भरणीची पाहणी केली, पण त्यावर अद्यापही कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.
पालिकेच्या पी-उत्तर (मालाड) आणि आर-दक्षिण (कांदिवली) विभाग कार्यालयांच्या हद्दीतून पोयसर नदी धावते. लालजीपाडा येथे पोयसर नदीचा एक किनारा पी-उत्तर, तर दुसरा किनारा आर-दक्षिण विभाग कार्यालयाच्या हद्दीत येतो. एकेकाळी खाडीचा हा भाग खारफुटीने व्यापला होता. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये खाडीमधील बहुतांश दलदलीच्या भागावर मोठय़ा प्रमाणावर भरणी करण्यात आली. परिणामी खारफुटीची कत्तल झाली. हळूहळू भरणी केलेल्या भागावर आता काही गॅरेजेस उभी राहिली आहेत.
पावसाळ्यात समुद्राला उधाण आल्यानंतर पोयसर नदीमधून वाहणारे पाणी खाडीतील दलदलीचा भाग सामावून घेत होते. मात्र आता शेकडो ट्रक माती टाकून खाडीचा काही भाग बुजविण्यात आल्याने पावसाळ्यात या भागात बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे. पोयसर नदीजवळच असलेले इंदिरा नगर, वल्नई नगर, लालजीपाडा, डहाणूकरवाडी, जनता कॉलनी, शास्त्रीनगर, अभिलाश नगर आदी परिसरात पाणी साचण्याची भीती निर्माण झाली आहे.
खाडीमधील भरावाबाबत विचारणा केली असता काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका गीता यादव म्हणाल्या की, या संदर्भात पी-उत्तर आणि आर-दक्षिण विभाग कार्यालयाशी अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आला. खाडीत झालेल्या भरणीची बाब अधिकाऱ्यांच्या कानावरही घालण्यात आली. पावसाळ्यात नदीकाठच्या वल्नई नगरला धोका निर्माण होतो. म्हणून तेथे संरक्षक भिंत उभारण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे पालिका अधिकाऱ्यांना करण्यात आली. पोयसर नदी पी-उत्तर आणि आर-दक्षिण विभाग कार्यालयांच्या हद्दीतून जाते. त्यामुळे दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी खाडीची पाहणी करावी अशी मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून करीत होते. अलीकडेच पालिका अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
खारफुटीमुळे संरक्षक भिंत उभारण्याबाबत पालिका अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविली, तर खाडीत करण्यात आलेल्या भरणीबाबत त्यांच्याकडे कोणतेच उत्तर नाही. केवळ नदीची हद्द निश्चित करण्याकडे अधिकाऱ्यांचा कल आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात नदीचा प्रवाह कोंडून आसपासचा परिसर जलमय होण्याची भीती आहे, अस गीता यादव म्हणाल्या.
प्रसाद रावकर, मुंबई