राज्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५ हजार कोटी रुपयांची मदत तात्काळ जाहीर करा, त्याचप्रमाणे १४६ शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी संबंधित मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी शनिवारी विधान परिषदेत केली.
राष्ट्रीय हवामान खात्याने वेळोवेळी महाराष्ट्र शासन, तसेच आपत्कालीन विभागाला गारपीटाची माहिती कळवली होती. हवामान खात्याचे अहवाल वेळेत मिळाल्यानंतरही अधिकारी व मंत्र्यांनी कारवाई का केली नाही. ज्या अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, त्यांच्यावर काय कारवाई करणार हे सरकारने सांगावे. तब्बल आठवेळा भारतीय हवामान खात्याने इशारे दिले होते. मात्र राज्याचे अधिकारी झोपा काढत बसले होते. सरकारने वेळीच काळजी घेऊन शेतकऱ्यांना सावध केले असते तर त्यांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले नसते, असे तावडे म्हणाले.