जिवावर आलेले संकट घरावर निभावले म्हणून देवाचे आभार मानायचे की मुलीच्या लग्नासाठी खस्ता खाऊन जमवलेल्या सामानाची राखरांगोळी झाली म्हणून आक्रोश करावा, हेच दामूनगरमधील पाखरे कुटुंबीयांना उमजत नव्हते.. वस्तीतील एकेका झोपडीने पेट घ्यायला सुरुवात केल्यावर जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडलेले पाखरे कुटुंबीय संध्याकाळी झोपडीच्या उरलेल्या राखेतून सोन्याचे कण शोधण्याची निष्फळ धडपड करीत होते.. २० डिसेंबरला मुलीच्या होणाऱ्या लग्नासाठी केलेला बस्ता, बँकेतून काढून आणलेले पैसे, सोन्याचे दागिने आगीने भस्मसात केले होते.
दामूनगरला लागलेल्या आगीने अवघ्या दोन तासांत दोन हजार कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त केला. या कुटुंबांपैकी एक म्हणजे रंजना पाखरे यांचे कुटुंब. त्यांच्या मुलीचे येत्या २० डिसेंबरला लग्न आहे. मुलीचे लग्न म्हणजे आईच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण. त्यासाठी पाखरे कुटुंबीयांनीही गेले वर्षभर तयारी केली होती. कपडय़ांपासून दागिन्यांपर्यंत आणि नव्या वस्तूंपासून लग्नासाठी जमवलेल्या पै-पैची जमवाजमव गेला महिनाभर सुरू होती. सोमवारी दुपारी दामूनगरला आग लागली आणि हे सर्व कष्ट एका क्षणात आगीत भस्म झाले. मुलीच्या लग्नाचे आता काय करायचे, असा प्रश्न पाखरे यांना पडला आहे. त्या लोखंडवाला भागात घरकाम करतात. त्यातून पोटापुरते पैसे मिळतात. मुलीनंतर लहान मुलगा आहे. त्याच्या शिक्षणाचा खर्च आहे. हा सर्व खर्च सांभाळून लग्नासाठी पैसे जमवले होते.. आता डोक्यावर छतही राहिले नाही. अंगावर कपडे नाहीत, मुलीचा नवा संसार कसा उभारून देऊ.. हे प्रश्न रंजना पाखरे यांचे मन पोखरत आहेत. आग आटोक्यात आली तेव्हा जो तो आपापल्या घराकडे धावला, मात्र तिथे राखेशिवाय काहीच शिल्लक नव्हते. आयुष्यभराच्या पुंजीची आठवण केवळ पत्र्यांचे तुकडे आणि राख यातच उरली होती.
राख झाली असली तरी आशा अधिक चिवट असते. सोमवारी संध्याकाळी अंधार पडेपर्यंत रंजना पाखरे आपल्या जळालेल्या घरात जाऊन मुलीच्या लग्नासाठी केलेले सोने राखेत हात घालून शोधत होत्या. परंतु राखेशिवाय हाती काहीच लागले नाही. महिन्याभराचे धान्य, कपडे काहीच राहिले नव्हते. होती फक्त भकास शांतता. लग्नाच्या सोहळ्यात आनंदमय झालेले घर राखेच्या ढिगाऱ्याखाली होते. आयुष्यभर घरकाम करून मुलांना वाढवणाऱ्या या कुटुंबाला पुन्हा नवा डाव सुरू करावा लागणार आहे.

आगीने घरे जाळली असली तरी माणुसकी मात्र त्या आगीत तावूनसुलाखून आणखी झळाळली. दामूनगरच्या आगीत घरे भस्मसात झालेल्या २००० कुटुंबीयांच्या निवाऱ्यासाठी, जेवणासाठी, अंथरुणांसाठी त्यांचे शेजारी धावून आले. रात्री मोकळ्या जागेत आसरा घेतलेल्या या कुटुंबीयांच्या व्यवस्थेसाठी लोखंडवाला इमारतीतील रहिवाशांनी तसेच समतानगरमधील रहिवाशांनी पुढाकार घेतला. छाया : वसंत प्रभू