लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : गेल्या वर्षी अग्निशमन दलाच्या भरतीत निवड होऊन कामावर रुजू झालेले अग्निशमन दलातील ४५९ जवान गेल्या चार महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. कामावर हजर होऊनही वेतनापासून वंचित राहावे लागत असल्याने संबंधित अग्निशामकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून या गोंधळाबाबत कोणतेही ठोस कारण सांगण्यात आलेले नाही.

गेल्या वर्षी अग्निशमन दलात झालेल्या भरतीसाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून, तसेच देशाच्या इतर भागातून अनेकजण मुंबईत दाखल झाले. या भरतीदरम्यान एकूण ९१० उमेदवारांची निवड करण्यात आली. यात पुरुषांसह महिलांचाही समावेश होता. पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या ५५५ उमेदवारांना प्रशिक्षणासाठी मुंबईतील विविध अग्निशमन केंद्रात पाठविण्यात आले. जून २०२३ पासून सुरू असलेल्या सहा महिन्यांच्या प्रशिक्षणात एकूण ४५९ उमेदवार उत्तीर्ण झाले. अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना वाढीव प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, डिसेंबर २०२३ पासून दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात उत्तीर्ण झालेले ४५९ उमेदवार २३ जानेवारीपासून अग्निशमन दलात रुजू झाले. रुजू झालेल्या नवीन अग्निशामकांना ४० हजार रुपये पगार असून त्यांना ४ महिन्यांपासून वेतनापासून वंचित राहावे लागले आहे.

आणखी वाचा-मालमत्ता करापोटी पालिकेच्या तिजोरीत ४३२० कोटी जमा, कर भरण्यासाठी केवळ तीन दिवस

महापालिकेच्या कामगार संघटनांकडून याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, याबाबत अग्निशकामांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. वेतनापासून वंचित राहिलेले बहुतांश अग्निशामक ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातून मुंबईत आले आहेत. तसेच, अनेकजण घरातील एकमेव कमावते असल्याने त्यांची आर्थिक बाजू प्रचंड कमकुवत झाली आहे. अनेकांचे बँकेचे हफ्ते थकल्याने त्यांना तणावाचा सामना करावा लागत आहे. अनेकदा वरिष्ठांकडे वेतनासंदर्भातील समस्यांच्या निवारणासाठी गेले असता केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत, असा आरोप अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. तसेच, लवकरच वेतन मिळेल, असे आश्वासन दिले जाते. अग्निशामकांवरील अन्यायाची माहिती मिळताच पालिकेच्या कामगार संघटनांनाही संबंधित अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. लवकरच या समस्येवर तोडगा काढू, असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचे कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिकेतील सामान्य प्रशासन विभागाकडून नियुक्ती पत्र मिळाल्यानंतर नोकरीवर रुजू होण्यास सांगितले गेले. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांची मूळ कागदपत्रे तपासण्यात येतात. ही प्रक्रिया प्रचंड वेळखाऊ आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना अनेक महिने पगार मिळत नाही, असे एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.या संदर्भात अग्निशमन प्रमुख अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. मात्र याबाबत आपल्याला काहीच कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.