लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेला यंदा ४३२० कोटींचा मालमत्ता कर वसूल करण्यात अखेर यश आले आहे. यंदा मालमत्ता कर भरण्यासाठी २५ मेची मुदत देण्यात आली असून मालमत्ता कर भरण्यासाठी केवळ तीन दिवस उरले आहेत. तर पालिकेकडेही मालमत्ता कर वसुलीचे उद्दीष्टय गाठण्यासाठी केवळ तीन दिवस उरले आहेत. २५ मेनंतर करभरणा केल्यास मालमत्ताधारकांना दरमहा २ टक्के दंड लावण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

पालिकेच्या करनिर्धारण आणि संकलक विभागाने चालू आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यास २७ फेब्रुवारीपासून सुरूवात केली होती. मालमत्ता कराची देयके वितरित करण्यास उशीर झाल्यामुळे यंदा करभरणा करण्यासाठी ३१ मार्चऐवजी २५ मेपर्यंतची मुदत देण्यात आली. मात्र तरीही मालमत्ता करवसुली करताना पालिकेच्या करनिर्धारण व संकलक विभागाची दमछाक झाली आहे. मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी करनिर्धारण आणि संकलन खात्याने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत ४३२० कोटींचा मालमत्ता कर वसूल झाला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात पालिकेने ४५०० कोटींचे उद्दीष्ट्य ठेवले होते. त्यात आता केवळ १८० कोटींची तूट आहे.

आणखी वाचा-एसटीच्या नव्या ऑनलाइन आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा प्रतिसाद, पाच महिन्यात १२.९२ लाख तिकीटांची विक्री

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्यासाठी शनिवारी २५ मेपर्यंतची मुदत आहे. या मुदतीत करभरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांच्या थकीत करावर दरमहा २ टक्के दंड आकारला जाईल, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. या कालावधीत मोठ्या संख्येने नागरिक करभरणा करतील असा अंदाज आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी विशेष तयारी केली आहे. गुरुवारी २३ मे आणि शुक्रवारी २४ मे रोजी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत, तसेच शनिवार, २५ मे रोजी सकाळी ८ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. तसेच चोवीस विभाग (वॉर्ड) कार्यालयांसह मुख्यालय तसेच एल विभागातील तुंगा व्हिलेज, एस विभागातील कांजुरमार्ग (पूर्व) येथील लोढा संकुल इमारत आणि पी (पूर्व) विभागातील नवीन नागरी सुविधा केंद्रे २३, २४ मे रोजी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत, तसेच शनिवारी २५ मे रोजी सकाळी ८ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत सर्व विभागांमध्ये करनिर्धारण व संकलन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

आणखी वाचा-मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी गुरुवारी एका तासाचा वाहतूक ब्लॉक

मालमत्ताधारकांनी २५ मे रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत करभरणा न केल्यास त्यानंतर त्यांच्या थकीत करावर दरमहा २ टक्के दंड आकारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, बहुतांशी मालमत्ताधारक अखेरच्या क्षणी कर भरणा करतात. त्यामुळे बुधवारी पालिकेकडे ९२.४८ कोटींची करवसुली झाली. तर ३१ मार्चची मुदत उलटल्यानंतर ११२४ कोटींचा मालमत्ता कर जमा झाला असल्याचे करनिर्धारण व संकलक विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांनी सांगितले.