सोनई तिहेरी हत्याकांड : एकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटका

 

संपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या २०१३ मधील सोनई तिहेरी हत्याकांडाप्रकरणातील सहापैकी पाच दोषींच्या फाशीवर उच्च न्यायालयाने सोमवारी शिक्कामोर्तब केले. एका दोषीची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.

खोटय़ा प्रतिष्ठेसाठी करण्यात आलेले हे हत्याकांड दुर्मीळातील दुर्मीळ प्रकरण असल्याचे नमूद करत न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने रघुनाथ ऊर्फ पोपट दरंदले (४८), प्रकाश दरंदले (३४), रमेश दरंदले, गणेश दरंदले (१९), अशोक नवगिरे (२८) आणि संदीप कुऱ्हे (३३) यांची फाशी कायम केली. या वेळी न्यायालयाने अशोक नवगिरे या दोषीची मात्र पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.

कनिष्ठ न्यायालयाने सातपैकी सहा आरोपींना दोषी ठरवले होते व त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्या वेळी अशोक फलके याची निर्दोष सुटका करण्यात आली होती. तर रघुनाथ, प्रकाश, रमेश, गणेश, अशोक नवगिरे आणि संदीप कुऱ्हे यांना दोषी ठरवत फाशीची सुनावली होती. या सगळ्यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. राज्य सरकारनेही त्यांची फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी याचिका केली होती. महिन्याहून अधिक काळ दोषींच्या अपिलावर सुनावणी सुरू होती. सोमवारी न्यायमूर्ती धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती शिंदे यांनी नवगिरे वगळता अन्य आरोपींनी दाखल केलेले अपील फेटाळून लावले. तसेच कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा कायम केली.

सोनईतील नेवासा फाटा येथे १ जानेवारी २०१३ रोजी तीन तरुणांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. आतंरजातीय प्रेमप्रकरणातून या तिघांची हत्या करण्यात आल्याचे तपासादरम्यान उघड झाले. उच्चवर्णीय मुलीवर प्रेम केले म्हणून आरोपींनी सचिन सोहनलाल धारु (२३), संदीप थनवार (२४) आणि राहुल कंडारे (२६) या तिघांची क्रूरपणे हत्या केली होती. साक्षीदारांवर दबाव टाकण्यात येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आल्यावर दोषींवरील खटला नाशिक सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. खटल्यात ५३ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली होती.

प्रकरण काय?

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई गावातील पोपट ऊर्फ रघुनाथ दरंदले यांची मुलगी नेवासा फाटा येथील घाडगे पाटील शिक्षण संकुलातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिकत होती. याच संस्थेत सचिन धारू साफसफाईचे काम करत असे. रघुनाथ याच्या मुलीची सचिनशी मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्याची कुणकुण लागल्यावर रघुनाथ, त्यांचा मुलगा गणेश, चुलत भाऊ रमेश, प्रकाश, मेहुण्याचा मुलगा संदीप कुऱ्हे आणि त्याचे नातेवाईक अशोक फलके तसेच रघुनाथ यांच्याकडे यांचा माजी ट्रॅक्टरचालक अशोक नवगिरे यांनी तिघांच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार रघुनाथ याच्या घराजवळच्या शौचालयाच्या टाकीतला मैला उचलून टाकण्याचे काम आहे, त्याचे चार हजार रुपये मिळतील, असे अशोक नवगिरेने सचिनला सांगितले. सचिन कामाला तयार झाला. १ जानेवारी रोजी २०१३ रोजी त्याला विठ्ठलवाडीला बोलावण्यात आले. काम मोठे होते. त्यामुळे सचिनने आपल्यासोबत संदीप थनवार आणि कंडारे यांना घेतले.

हे तिघे विठ्ठलवाडीला आल्यानंतर त्या मुलीचे वडील रघुनाथ, प्रकाश दरंदले, रमेश दरंदले, गणेश, संदीप कुऱ्हे, अशोक नवगिरे यांनी सचिनला घेरले. त्याला मुलीचा नाद सोड म्हणून बजावले. त्या वेळी सचिनने आम्ही लग्न करणार आहोत असे सांगितले. ते ऐकल्यानंतर आरोपींनी सचिनला आणि त्याच्या सोबत आलेल्या त्या दोघांनाही ठार टाकले. अतिशय क्रूरपणे त्यांनी सचिन आणि कंडारेच्या खांडोळ्या केल्या. कडबा कापण्याच्या अडकित्त्याने त्यांचे मुंडके, हातपाय तोडण्यात आले. संदीपला शौचालयाच्या टाकीत बुडवून मारण्यात आले. यानंतर, दोघांचे खून करून संदीपने आत्महत्या केली, असा बनाव पोपट दरंदले याने केला. सोनई पोलीस ठाण्यात जाऊन त्याने अशीच बतावणी केली, पण हा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला.