ऐशोआरामी जगण्यासाठी सोनसाखळी चोर बनलेल्या मुंब्र्यातील गृहिणीला अखेर ठाणे रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. मागच्या दोनवर्षांपासून ही महिला मुंबईतील लोकल ट्रेन्समधून सोनसाखळया चोरायची. आरोपी महिलेचा पती दुबईला नोकरीला आहे. पती चैन करण्यासाठी पैसे देत नसल्याने तिने चोरीचा मार्ग पत्करला. आरोपी महिलेला नवीन कपडे आणि दागदागिने घालून मिरवण्याची हौस होती.

मुंब्र्यातील एका चांगल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये ती रहाते. नवरा दुबईवरुन पैसे पाठवयाचा पण ते पैसे रोजचा खर्च आणि मुलांच्या शिक्षणापुरता पुरायचे. त्याव्यतिरिक्त कोणतीही हौसमौज करता येत नव्हती म्हणून आपण गुन्ह्याचा मार्ग स्वीकारला असे तिने पोलिसांना सांगितले. ठाण्यात सोनसाखळी चोरीच्या तक्रारी वाढल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिला अटक केली.

आरोपी महिला अन्य नोकरदार महिलांप्रमाणे आपण कामावर चाललोय असे दाखवून गर्दीने भरलेल्या महिलांच्या डब्ब्यात चढायची. सावज हेरल्यानंतर ती सफाईदारपणे गळयातील सोनसाखळी उडवायची असे रेल्वे पोलिसांनी सांगितले. ज्या रेल्वे स्थानकातून सोनसाखळी चोरीच्या तक्रारी आल्या होत्या. पोलिसांनी तिथले सीसीटीव्ही फुटेज तपासले व सापळा रचून आरोपी महिलेला अटक केली. आरोपी महिला चोरलेले दागिने मुंब्र्यात एका सोनाराला विकायची. पोलिसांनी तिच्याकडून १ लाख ३५ हजाराचे दागिने जप्त केले. आयपीसीच्या कलम ३७९ अंतर्गत पोलिसांनी तिला अटक केली आहे.