अमोल परांजपे
एस्टोनियातील टार्टू या शहरातील विमान उड्डाणे फिनएअर फिनलंडच्या कंपनीने थांबवली. कारण या भागातील जीपीएस यंत्रणा जॅम होत असल्यामुळे वैमानिकांसमोर अडचणी उभ्या राहतात, असा दावा एस्टोनियाचे परराष्ट्रमंत्री मार्गस साहक्ना यांनी अलिकडेच केला. एस्टोनियामध्ये जीपीएस जॅमिंगसाठी रशिया जबाबदार असल्याचा आरोप होऊ लागला आहे. एस्टोनियामध्ये हे का होत आहे, यामागे खरोखर रशिया आहे का, असेल तर त्यांचा उद्देश काय, जीपीएस प्रणाली महत्त्वाची का आहे, या प्रश्नांची उत्तरे शोधणारे हे विश्लेषण…
जीपीएस म्हणजे काय?
‘ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम’ या प्रणालीचे संक्षिप्त रूप म्हणजे जीपीएस… अनेक लहान-मोठ्या उपग्रहांचे जाळे आणि जमिनीवरील उपकरणांच्या मदतीने रेडिओ लहरींचा वापर करून वाहतुकीचे नियंत्रण करणारी ही प्रणाली अत्यंत लोकप्रिय आहे. आपणही कुठे जाताना वाहतूक कोंडी आहे का, हे तपासण्यासाठी याच प्रणालीचा वापर करतो. जहाजे, विमाने यांच्या वाहतुकीत जीपीएस सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. विमानांच्या दळणवळणासाठी काही वर्षांपूर्वीपर्यंत वापरात असलेल्या महागड्या ग्राउंड डिव्हाइसेसची जागा आता जीपीएसने घेतली आहे. विमानांचे उड्डाण, हवेत असताना अन्य विमानांची स्थिती तसेच विमान उतरवित असताना या यंत्रणेची मदत घेतली जाते. मात्र त्याच वेळी या यंत्रणेमध्ये अडथळे आणणेदेखील अत्यंत सोपे असते.
हेही वाचा >>> पाकिस्तानात घुसून अमेरिकी नौदलाने ओसामा बिन लादेनला कसं केलं ठार; ऑपरेशन ‘नेपच्यून स्पीयर’ काय होते?
जीपीएस जॅमिंग आणि स्पूफिंग म्हणजे काय?
जीपीएस प्रणाली ही रेडिओ लहरींवर अवलंबून असल्याने तिच्यात अडथळे आणणे सोपे आहे. अनेक देशांच्या लष्करांकडे जीपीएस जॅमिंग आणि स्पूफिंगचे तंत्रज्ञान आहे. ‘जॅमिंग’ म्हणजे साधारणत: जीपीएससाठी वापरण्यात येणाऱ्या रेडिओ लहरींपेक्षा अधिक ताकदवान लहरी सोडणे… यामुळे उपग्रहांना जाणाऱ्या संदेशांमध्ये गोंधळ उडतो. उदाहरण द्यायचे झाले, तर एखादा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम सुरू असताना बाजुला कुणी डॉल्बी वाजवला, तर ऐकणाऱ्याची जी अवस्था होईल, साधारणत: तशी स्थिती जीपीएस वापरणाऱ्यांची होते. यामुळे विमानांना चुकीचे संदेश जाऊन अपघात होण्याची शक्यता असते. दोन विमाने किंवा जहाजे एकमेकांवर आदळू शकतात. स्पूफिंगचे तंत्र यापेक्षा जरा किचकट असते. जीपीएस यंत्रणा विस्कळित करण्याऐवजी शत्रूराष्ट्राची विमाने किंवा जहाजांना चुकीचा संदेश पाठवून गोंधळ उडविणारे ते आधुनिक युद्धतंत्र आहे. यापैकी जॅमिंगच्या तुलनेने सोप्या पद्धतीचा वापर रशियाकडून बाल्टिक देशांमध्ये केला जात असल्याचा संशय आहे.
बाल्टिक देशांमध्ये काय घडत आहे?
एकेकाळी रशियन साम्राज्य आणि त्यानंतर सोव्हिएट रशियाचा भाग असलेले तीन बाल्टिक देश एस्टोनिया, लाटव्हिया आणि लिथुआनिया सध्या रशियन हल्ल्याच्या सावटाखाली आहेत. युक्रेनशी युद्ध छेडल्यानंतर आपल्यावर कधीही हल्ला होऊ शकतो, अशी या देशांना भीती आहे. अर्थात, हे देश ‘नॉर्थ ॲटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’चे (नेटो) सदस्य असल्यामुळे रशियाने थेट हल्ला केला, तर अमेरिकेसह युरोपातील बलाढ्य देश बाल्टिक प्रदेशासाठी युद्धात उतरतील. त्यामुळेच रशियाने या देशांमध्ये छुपा हस्तक्षेप सुरू केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. ‘जीपीएस जॅमिंग’ हा याच छद्मयुद्धाचा एक भाग असू शकतो. रशिया-युक्रेनमध्ये तणाव वाढीला लागल्यानंतर, गेल्या दोन वर्षांपासून बाल्टिक देशांमध्ये अशा घटना वाढीला लागल्या आहेत. या जॅमिंगचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न केला असता, सकृद्दर्शनी यामागे रशिया असल्याचा संशय आहे.
हेही वाचा >>> कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर जीव गमावलेल्या मुलींचे पालक दाखल करणार गुन्हा, नेमके प्रकरण काय?
जीपीएस जॅमिंगमागे रशियाचा हात?
गेल्या काही महिन्यांत जॅमिंगचा अनुभव आलेल्या विमानांच्या स्थितीचा विश्लेषकांनी अभ्यास केला व जॅमिंग नेमके कुठून होत आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला. बहुतांश वेळा कॅलिनिनग्राड या भागात ही जॅमिंग उपकरणे असावीत, असा संशय व्यक्त झाला. लिथुआनिया आणि पोलंड यांच्यामध्ये हा चिंचोळा प्रदेश असून तेथे रशियाचे सैन्य मोठ्या प्रमाणात आहे. मार्च महिन्यात ब्रिटनचे संरक्षणमंत्री ग्रँट शॅप्स यांचे विमान कॅलिनिनग्राडमध्ये जीपीएस जॅमिंगमुळे अडकून पडले होते. अलिकडे हौशी ड्रोन उड्डाणे व अन्य विमानांच्या स्थितीचा अभ्यास करून जॅमिंगचे ठिकाण हे रशियाच्या मुख्य भूमीत, सेंट पीटर्सबर्ग शहराजवळ असावे असा निष्कर्ष काढला आहे. या भागात रशियाची जॅमिंग तंत्र प्रणाली असल्याचा भक्कम पुरावा असल्याचा दावाही करण्यात आला आहे. अर्थातच या आरोपांवर अद्याप रशियाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नसले, तरी पुरावे त्याच्याकडेच अंगुलीनिर्देश करत आहेत.
रशिया जॅमिंगचा वापर का करीत आहे?
रशिया छद्मयुद्धाद्वारे बाल्टिक देशांमध्ये हस्तक्षेप करीत असल्याची भीती असली, तरी काही अभ्यासकांच्या मते हे जॅमिंग स्वसंरक्षणासाठी केलेले असू शकते. गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिका-युरोपने दिलेली अत्याधुनिक लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन युक्रेनच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. युक्रेनच्या ड्रोनना चकविण्यासाठी रशियाकडून या प्रणालीचा वापर केला जात असेल, अशी शक्यता आहे. युक्रेनकडूनही अनेकदा या जॅमिंग तंत्राचा वापर होत असला, तरी रशियाकडील यंत्रणा अधिक ताकदवान आहे. त्यामुळेच रशिया-युक्रेनच्या जवळ असलेल्या बाल्टिक देशांमध्येही जीपीएसमध्ये व्यत्यय येण्याच्या घटना वारंवार घडत असाव्यात, असा अंदाज आहे. इस्रायलच्या ड्रोनविरोधी प्रणालीमुळे पश्चिम आशियातही जॅमिंगचा वारंवार अनुभव येतो. त्यामुळे रशियाकडून होत असलेले जीपीएस जॅमिंग हे आत्मसंरक्षणासाठी असले, तरी त्यामुळे बाल्टिक देशांमधील नागरी विमान वाहतूक, जहाजांचे दळणवळण आणि रस्ते-रेल्वे वाहतुकीला मात्र याचा वारंवार फटका बसू लागला आहे.
amol.paranjpe@expressindia.com