कोट्यवधींच्या सिंचन घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी अखेर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) मुंबईतील मुख्यालयात हजेरी लावली. अजित पवार मंत्रीपदावर असतानाच्या काळात १२ प्रकल्पांचा खर्च अवास्तव वाढवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

अजित पवार यांच्यासह राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना काही दिवसांपूर्वी एसीबीने चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स धाडले होते. मात्र, समन्स जारी करूनही दोघेही निर्धारित तारखेला उपस्थित राहिले नाहीत. हे दोन्ही नेते स्वत: उपस्थित न होता त्यांचे प्रतिनिधी हजर होते. परंतु या प्रतिनिधींकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने तटकरे आणि पवार यांना हजर राहण्याबाबत कळविण्यात आले होते. अखेर मंगळवारी सुनील तटकरे यांनी चौकशीसाठी एसीबीच्या कार्यालयात उपस्थिती लावली. तटकरे यांची तब्बल साडेतीन तास चौकशी झाली. तटकरे यांच्या उपस्थितीनंतर अजित पवार देखील जातीने चौकशीसाठी उपस्थित राहणार का? याकडे साऱयांचे लक्ष लागून होते. अखेर आज अजित पवार एसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले.