मुंबई : पूर्व उपनगरामध्ये शनिवारी दुपारी वायुगळती झाल्याच्या संशयामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. काही नागरिकांनी वायुगळती होत असल्याची तक्रार अग्निशमन दलाकडे केल्यामुळे यंत्रणांची धावपळ उडाली.

या संदर्भात अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध घेतला. मात्र वायुगळतीचा प्रकार आढळला नाही. दरम्यान, गेल्या वर्षभरात अधूनमधून अशा प्रकारे वायुगळती होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत. अद्यापही ही वायुगळती कुठून होते याचा थांगपत्ता लागलेला नाही.

गोवंडी, घाटकोपर, विक्रोळी आणि पवई परिसरांत मोठय़ा प्रमाणात वायुगळती होत असून त्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी शनिवारी दुपारी चारच्या सुमारास अग्निशमन दलाकडे आल्या. त्यानुसार अग्निशमन दलाच्या जवानांनी वायुगळतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वायुगळती नेमकी कुठून होत आहे, याचा शोध लागला नाही.

गेल्या वर्षभरात अशा प्रकारे तीन वेळा वायुगळतीच्या तक्रारी अग्निशमन दलाकडे करण्यात आल्या होत्या. जून महिन्यात तर दोन वेळा अशीच घटना समोर आली होती. त्यामुळे चेंबूर परिसरात असलेल्या सर्व गॅस कंपन्यांमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध घेतला होता. मात्र तेव्हाही या गळतीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.