मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (टी २) वांद्रयाला जाणे सोपे व्हावे आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) टी १ जंक्शनवर नवीन उड्डाणपुलाचे काम हाती घेतले होते. हे काम पूर्ण झाले असून हा उड्डाणपूल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीस खुला होण्याची शक्यता आहे.

आंतराराष्ट्रीय विमानतळावरुन वांद्र्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. ही बाब लक्षात घेता विमानतळावरुन पुढे पश्चिम द्रुतगती मार्गावरुन अंधेरी किंवा वांद्र्याला जाणे सोपे व्हावे यासाठी एमएमआरडीएने टी १ जंक्शन येथे नवीन उड्डाणपुल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ७९० मीटर लांबीचा आणि आठ मीटर रुंदीचा अशा उड्डाणपुलाच्या कामाचे कंत्राट मेसर्स आर. पी. एस. इन्फ्राप्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले. तर २०२१ मध्ये या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली. नंदगिरी विश्रामगृह येथून हा उड्डाणपुल सुरु होत असून साईबाबा मंदिर भाजीवाडा येथे येऊन संपतो. ४८.४३ कोटी रुपये खर्च करून हाती घेण्यात आलेल्या या उड्डाणपुलाचे काम आता पूर्ण झाले आहे.

हेही वाचा >>>जंबो करोना काळजी केंद्र घोटाळा प्रकरण : संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना जामीन, सुटका मात्र नाही

पुलाचे बांधकाम १०० टक्के पूर्ण झाले असून आता दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरु आहे. काम पूर्ण झाल्याने आता हा उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मार्चच्या पहिल्या आठवड्यात हा पूल वाहतुकीस खुला होईल, अशी माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हा उड्डाणपुल खुला झाल्यास पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होऊ शकेल.