मुंबई : घाटकोपर दुर्घटनेनंतर मुंबई रेल्वेच्या हद्दीत उभारलेले महाकाय जाहिरात फलक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. महालक्ष्मी स्थानकालगत असलेले महाकाय फलक हटविण्यासाठी पालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागाने रेल्वे प्रशासनाला गेल्यावर्षी नोटीस पाठवली होती. मात्र, पालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करीत हे सगळे जाहिरात फलक महालक्ष्मी स्थानकालगत अद्यापही तसेच उभे असलेले दिसतात.
मुंबईत भलेमोठे जाहिरात फलक उभारण्यासाठी पालिकेची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी पालिकेच्या नियमावलीची अंमलबजावणी करावी लागते. मात्र, रेल्वे प्रशासन मुंबई महानगरापालिका प्रशासनाला याबाबत जुमानत नाही, हे वारंवार उघड झाले आहे. रेल्वेच्या हद्दीत जाहिरात फलक लावताना त्याकरीता पालिकेची परनवानगीही घेतली जात नाही. तसेच त्यासाठीचे परवाना शुल्कही भरले जात नाही आणि त्यासाठी नियमही पाळले जात नाहीत.
आणखी वाचा-मुंबईत गुरुवारीही उष्मा आणि पावसाचा अंदाज
अनेक जाहिरात फलक रेल्वेच्या हद्दीत उभारले असून त्याचा पुढचा जाहिरातीचा भाग अनेक ठिकाणी थेट रस्त्यावर आलेला आहे. वांद्रे स्थानकातही पूर्व दिशेला असाच एक भलामोठा जाहिरात फलक लावण्यात आला आहे. महालक्ष्मी स्थानक परिसरात सेनापती बापट मार्गाकडून रखांगी चौकापर्यंतच्या रस्त्यावर असेच किमान पाच ते सहा महाकाय जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. ते पदपथ आणि रस्त्यावर आलेले आहेत. त्यामुळे हे जाहिरात फलक काढून टाकावे, अशी सूचना पालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभाग कार्यालयाने पश्चिम रेल्वेला गेल्यावर्षी जुलै महिन्यात केली होती. याबाबत पालिका प्रशासनाने २०१९ पासून पश्चिम रेल्वेला अनेक पत्रे पाठवली असून गेल्या पावसाळ्यातही स्मरणपत्र पाठवले होते. मात्र रेल्वेने हे फलक अद्याप हटवलेले नाहीत. घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर हे फलक पुन्हा चर्चेत आले आहेत. रेल्वे प्रशासनाने लावलेल्या जाहिरात फलकांचे खांब रेल्वेच्या हद्दीत असले तरी त्याचा जाहिरातीचा वरचा अवजड लोखंडी भाग हा रस्त्यावर येत असतो. महालक्ष्मी स्थानकालगत असलेले महाकाय फलक हटविण्यासाठी पालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागाने रेल्वे प्रशासनाला गेल्यावर्षी नोटीस पाठवली होती.
फलकांवर मद्याच्याही जाहिराती
जाहिरात फलक कोसळल्यास पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. असे या नोटीसीत म्हटले होते. जाहिरात फलकाचा लोखंडी सांगाडा कमकुवत होऊन किंवा वादळवाऱ्यात कोसळल्यास ते रस्त्यावर पडतील, त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. तसेच या फलकांवर कोणत्याही प्रकारच्या जाहिराती लावल्या जातात. काही महिन्यांपूर्वी या होर्डींगवर मद्याच्या जाहिराती लावण्यात आल्या होत्या, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, रेल्वे व पालिका यांच्यातील हा वाद अनेक वर्षांपासून सुरू असून याबाबत पालिका प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही सादर केले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटला प्रलंबित असून सप्टेंबर महिन्यात सुनावणी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.