दादर रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे तीन महिन्यांच्या मुलीचे अपहरण करणारा आरोपी रंगेहाथ पकडला गेला. शनिवारी पहाटे माहीम येथून एका इसमाने तीन महिन्यांच्या मुलीचेअपहरण केले होते. अवघ्या सहा तासात या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक करुन तान्ह्या बाळाला आई-वडिलांकडे सुपूर्द केले.
नवीश आणि अंजू डिसोजा हे दांपत्य माहिमला पदपथावर राहतात. नवीश हे वाहतूक पोलिसांच्या टोईंग गाडीवर काम करतात. शुक्रवारी रात्री नवीन ११ वाजता कामाला गेले. पहाटे ३ च्या सुमारास त्यांची पत्नी अंजू हिला तीन महिन्यांची मुलगी इशिका जागेवर नसल्याचे लक्षात आले. मुलीसाठी शोधाशोध सुरु केली. मुलगी हरविल्याचे कळल्यानंतर नवीन पहाचे चार वाजता घरी आला. त्यांनी माहिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. माहिम पोलिसांनी तात्काळ इशिकाच्या शोधासाठी पथक स्थापन केले.
आमच्याकडे कसलाच दुवा नव्हता. परंतु वाशी नाका येथे राहणाऱ्या सत्या नाडर (३०) याच्याशी नवीशचा वाद झाला होता एवढा धागा पकडून आम्ही चेंबूरला त्याच्या घरी पोलीस पाठवले होते, अशी माहिती माहीम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिली.
  दरम्यान, दादर रेल्वे पोलिसांना सत्या नाडर याच्याजवळ असलेली एक लहान मुलगी रडत असल्याची दिसली. त्यांना संशय आल्याने त्यांनी नाडरची चौकशी केली.ही माझी मुलगी असून पत्नीशी भांडण झाल्याने घर सोडून आल्याचे खोटे कारण त्याने सांगितले. परंतु त्याच्या उत्तराने पोलिसांचे समाधान झाले नाही आणि त्यांनी नाडरला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान माहीम पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नाडरला ताब्यात घेतले आणि इशिकाची सुटका झाली.
नवीश डिसोजा यांच्याशी आपला वाद झाला होता. त्याला धडा शिकविण्यासाठी आपण इशिकाचे अपहरण के ल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. न्यायालयाने नाडरची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. नाडर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर चोरीचे सहा गुन्हे आहेत. तो हे बाळ कुणाला विकण्याचा प्रयत्न करणार होता का त्याची आम्ही चौकशी करणार असल्याचे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.
दोन अपहरणकर्ते अटकेत
आरोपी नाडर तीन महिन्यांच्या इशिकाला घेऊन दादर स्थानकात गेला होता. तेव्हा ती रडत होती. त्यावेळी तिथे असलेल्या रेल्वे पोलिसांना त्याचा संशय आला आणि हा अपहरणकर्ता सापडला. जर पोलिसांनी त्याला हटकले नसते तर आरोपी फरार झाला असता असे दादर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरक्षक किरदत्त म्हणाले. २१ जानेवारीला सुद्धा कफ परेड पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या सर्तकतेमुळे असाच एक अपहरणकर्ता रंगेहाथ सापडला होता. अनिल थोरात या अपहरणकर्त्यांने तेजस नाईक या ४ वर्षांच्या मुलाचे अपहरण केले होते. त्याला तो घेऊन जात असतांना बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना त्याचा संशय आला. कारण काही वेळापुर्वी त्यांनी तेजसला त्याला वडिलांसोबत पाहिले होते. मग हा अनोळखी दुसरा माणूस कोण असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी पाटीलची चौकशी केली आणि अपहरणाचा डाव उघडकीस आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl child kidnaper arrested
First published on: 28-01-2013 at 03:29 IST