प्रभागात दोन कोटी रुपयांच्या कचऱ्याच्या डब्यांचे वाटप

मुंबई : पालिका प्रशासनाची पुन्हा स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रभागावर कृपादृष्टी पडली आहे. त्यांच्या प्रभागात घरोघरी ओला आणि सुका कचरा स्वतंत्र ठेवण्यासाठी कचऱ्याच्या डब्यांचे वाटप करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. स्थायी समितीनेही या प्रस्तावाला मंजुरी दिल्यामुळे आता केवळ प्रभाग क्रमांक २०९ मध्ये घरोघरी या डब्यांचे वाटप होणार आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होऊ घातली आहे. मात्र करोना संसर्गामुळे निवडणुकीबाबत अद्याप अनिश्चितता आहे. मात्र तरीही काही नगरसेवक आपापल्या प्रभागांमधील मतदारांवर लक्ष केंद्रित करू लागले आहेत. माझगाव परिसरातील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या प्रभाग क्रमांक २०९ मधील घराघरात प्रत्येकी ११ लिटर क्षमतेचे कचऱ्याचे दोन डबे देण्यात आले आहेत. प्रशासनाने सुमारे १० हजार कचऱ्याच्या डब्यांसाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

या डब्यांच्या खरेदीसाठी ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. निविदा प्रक्रियेत प्रथम लघुत्तम ठरलेल्या पंचरत्न प्लास्टिक्सला एक कोटी ८१ लाख ६० हजार रुपयांचे कंत्राट देण्यावर प्रशासनाने शिक्कामोर्तब केले होते. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत सादर करण्यात आला. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव पुकारला आणि त्याला तात्काळ मंजुरी देऊन टाकली.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपल्या प्रभागात कचऱ्याच्या डब्यांचे वाटप केल्याचे आणि त्यास दोन कोटी रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर त्याच कोणीही विरोध केला नाही. एकाही पक्षाच्या सदस्याने बैठकीत या प्रस्तावावर कोणतेच भाष्य केले नाही. एरवी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडणाऱ्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही यावेळी गप्प बसणेच पसंत केले.