मरिन ड्राइव्ह येथे बसविण्यात आलेल्या व्यायाम उपकरणांवरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि काँग्रेस आमदार नीतेश राणे यांच्यात सुरू असलेला वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे. नीतेश यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका करत पदपथावरील अतिक्रमणांबाबत पालिकेच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुढील आठवडय़ात नीतेश यांनी केलेली याचिका सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे.

मरिन ड्राइव्हवर व्यायामाची उपकरणे बसविण्यासाठी सागरी हद्द नियंत्रण कायद्याचे (सीआरझेड) नियम धाब्यावर बसवण्यात आलेली आहेत, असा मुख्य आरोप नीतेश यांनी याचिकेत केला आहे. २०१३ मध्ये माजी खासदार मिलिंद देवरा यांनीसुद्धा व्यायामाची उपकरणे बसविण्याची परवानगी पालिकेकडे मागितली होती. परंतु तत्कालिन पालिका आयुक्तांनी त्याला नकार दिला होता. त्यामुळे सध्याच्या पालिका आयुक्तांनी नेमक्या कोणत्या नियमांनुसार मरिन ड्राइव्ह येथे व्यायामाची उपकरणे बसविण्यास परवानगी दिली, असा सवाल नीतेश यांनी याचिकेत उपस्थित केला आहे.
या याचिकेत पालिकेसह राज्य सरकार तसेच डी एम फिटनेस यांनाही प्रतिवादी करण्यात आले असून याचिका पुढील आठवडय़ात सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे.