सरकारच्याच हस्तक्षेपामुळे निम्म्या शाळा वर्षभर परीक्षांविना

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना वर्षभरातील परीक्षेतील गुणांनुसार तीसपैकी गुण देण्याची सूचना शिक्षण विभागाने केली. मात्र, विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याची तंबी शिक्षण विभागानेच ऑक्टोबरमध्ये शाळांना दिली होती. त्यामुळे आता ३० गुणांचे मूल्यमापन करण्याचे शिक्षक आणि मुख्याध्यापकांसमोर आव्हान असून, मूल्यमापनाचा मुद्दा हा शिक्षण विभागासाठीच परीक्षांतील काठिण्यपातळीच्या प्रश्नासारखा बनला आहे.

दहावीची परीक्षा रद्द करून पर्यायी मूल्यमापन आराखडा शिक्षण विभागाने जाहीर केला. त्यानुसार नववीचे गुण ५० टक्के आणि दहावीचे गुण ५०  टक्के असे ग्राह््य धरण्यात येणार आहेत. दहावीच्या पन्नास टक्के गुणांमध्ये ३० गुणांचे मूल्यमापन हे विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील कामगिरीनुसार करायचे आहे. मात्र, वर्षभरात अनेक शाळांना विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता आलेल्या नाहीत. ज्या शाळांनी परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला त्या शाळांना परीक्षा न घेण्याची तंबी शिक्षण विभागानेच दिली होती. ऑक्टोबर २०२० मध्ये याबाबत विभागाने  शाळांना पत्र पाठवले होते. त्यामुळे आता कोणती कामगिरी ग्राह््य धरून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करायचे, असा प्रश्न शिक्षक आणि मुख्याध्यापकांसमोर आहे.

आता परीक्षा कशी घेणार?

ज्या शाळांना वर्षभर परीक्षा घेता आली नाही किंवा प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा घेता आलेल्या नाहीत अशा शाळांनी आता परीक्षा घेऊन मूल्यमापन करण्याची सूचना शिक्षण विभागाने पर्यायी मूल्यमापन आराखड्यात दिली आहे. मात्र, आता विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी कसे येणार? अनेक विद्यार्थी परीक्षा रद्द झाल्यामुळे गावी गेले आहेत. काही विद्यार्थी वर्षभर संपर्कात नाहीत अशा विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घ्यायची, असा प्रश्नही शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

घोळ का?

ऑनलाइन वर्गांमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे अनेक शाळांना शक्य झाले नाही. नियोजन करूनही कित्येक शाळांना परीक्षा न घेण्याची सूचना शिक्षण विभागाने केली. त्यानंतरही परीक्षा घेणाऱ्या शाळांच्या पालकांनीही तक्रारी केल्या. मग शिक्षण विभागाने अशा शाळांना फैलावर घेतले. त्यामुळे सत्र परीक्षांचे केलेले नियोजन बाजूला सारून शाळांनी परीक्षा रद्द केल्या.

हा विद्यार्थ्यांवरच अन्याय…

दहावीच्या वर्षभरातील चाचण्या अंतिम निकालात ग्राह््य धरण्यात येत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी त्या गांभीर्याने घेतातच असे नाही. आता त्या चाचण्यांचे गुण ग्राह््य धरणे हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे, असा मुद्दा अनेक शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षाही…

प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षांचे २० गुण द्यायचे आहेत. मात्र, करोनास्थितीमुळे अनेक शाळांना अद्यापही प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा घेता आलेली नाही.