पालिकेचे ‘मुंबई आरोग्य अभियान’यशस्वी करण्यासाठी उन्हातान्हात भटकणाऱ्या आरोग्य सेविका छेडछाड, विनयभंगाच्या प्रकारांमुळे त्रस्त झाल्या असून वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासन आणि सत्ताधारी मात्र याबाबत उदासिन राहिल्याने, घरोघरी जाऊन पल्स पोलिओ लसीकरण थांबविण्याचा इशारा तब्बल ३,५०० आरोग्य
सेविकांनी दिला आहे. महापालिकेचे ‘मुंबई आरोग्य अभियान’ यशस्वीपणे राबविणाऱ्या आरोग्य स्वयंसेविका झोपडपट्टय़ा, चाळींमधील घराघरात पोहोचून रुग्ण हुडकून काढतात, व पल्स पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देतात. कुटुंब नियोजनाचा प्रचार आणि प्रसार डास निर्मूलनासाठी वस्त्यांमधील पाण्याच्या पिंपात औषध टाकणे यासह पालिकेची अनेक कामे आरोग्य स्वयंसेविकांनाच करावी लागतात. त्यासाठी पालिकेकडून महिनाकाठी त्यांना जेमतेम चार हजार रुपये मानधन मिळते. गोरगरीब घरांतील या तब्बल ३,५०० महिला मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. प्रत्येक वॉर्डमधील पालिकेची  आरोग्य केंद्रे, दवाखाने, रेल्वे स्थानके,शाळा आदी ठिकाणच्या बुथवर एका
रविवारी बालकांना पोलिओचे डोस पाजण्याचे दिल्यानंतर हा डोस चुकलेल्या बालकांच्या शोधार्थ त्यांना पुढील पाच दिवस घरोघरी फिरावे लागते. अशा फिरतीत अनेकदा
विनयभंग, छेडछाडीचे प्रसंगही ओढवत असल्याने घरोघरी फिरण्यासाठी सोबत पालिकेचा एक कर्मचारी द्यावा, अशी त्यांची मागणी होती. परंतु आरोग्य अधिकाऱ्याकडे
तक्रारी करूनही सहकार्य मिळाले नाही,उलट एखाद्या स्वयंसेविकेने पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची तयारी दर्शविली तरी पालिका अधिकारी तिच्या पाठिशी उभे राहात नाहीत, अशी त्यांची तक्रार आहे. सुरक्षेबाबत प्रशासन उदासिन असल्याने स्वयंसेविका कमालीच्या संतापल्या आहेत. सुरक्षेच्या प्रश्नावर तोडगा काढला नाही तर पल्स पोलिओ
लसीकरण मोहिमेचे काम करणार नाही, असा पवित्रा स्वयंसेविकांनी घेतला आहे. समाजकंटकांकडून होणारी  छेडछाड टाळण्यासाठी घरोघरी फिरण्याची मोहीम बंद करावी,
नियोजित परिसरात पाच दिवस फिरण्याऐवजी एका ठिकाणी बूथ उभारावा, म्हणजे पोलिओ डोस चुकणाऱ्या बाळाला तेथे तो देता येईल, अशा या स्वयंसेविकांच्या मागण्या
आहेत.