चेन्नईत उपचारासाठी नेण्यात येत असलेल्या बाळाला विमानातच अस्वस्थ वाटू लागल्यामुळे उड्डाणानंतर सुमारे तासाभराने विमान पुन्हा मुंबई विमानतळावर उतरवावे लागल़े  त्यानंतर बाळाला तातडीने विमानतळावरच उपचार देण्याचे प्रयत्न करण्यात  आल़े  परंतु, दुर्दैवाने तत्पूर्वीचे बाळवर काळाची झडप पडली होती़
इंडिगो एअरलाइन्सचे ‘६इ- ४३१’ हे विमान रविवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास चेन्नईच्या दिशेने रवाना झाले. मात्र उड्डाणानंतर तासाभरातच विमानातील सात महिन्यांच्या एका बाळाला श्वसनाला त्रास होऊ लागला. या बाळाच्या हृदयाला तीन छिद्रे होती व त्याला चेन्नई येथे शस्त्रक्रियेसाठी नेण्यात येत होते, असे इंडिगोने काढलेल्या पत्रकात सांगण्यात आले आहे. विमानात या बाळावर प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रवाशांमध्ये कोणी डॉक्टर आहे का, अशी विचारणाही विमानातील कर्मचाऱ्यांनी केली. कर्मचाऱ्यांच्या धडपडीनंतरही बाळाची अस्वस्थता वाढतच गेली़  त्यामुळे शेवटी विमान मागे वळवून मुंबईच्या विमानतळावर उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला़
विमान तासाभराने मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर लगेच तेथील डॉक्टरांनी या बाळाची तपासणी केली. मात्र त्या वेळी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी घोषित केले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या विमानातील सर्व कर्मचाऱ्यांनी या बाळाला शक्य ती सर्व वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने त्याचा काही उपयोग झाला नाही, असे इंडिगो एअरलाइन्सकडून स्पष्ट करण्यात आले.