चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक टाळण्यासाठी जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने २० फेब्रुवारीपर्यंत त्यांना अटकेपासून दिलासा दिल्याने तूर्त तरी डॉ. लहाने यांची अटक टळली आहे.
मंगळवारी डॉ. लहाने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार आहेत. तशी माहिती दिल्यावरच उच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा मंजूर केला. दरम्यान, डॉ. लहाने यांनी गुन्हा रद्द करण्यासाठीही उच्च न्यायालयात याचिका केली आहे.
न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यासमोर डॉ. लहाने यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी आपल्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा दावा डॉ. लहाने यांच्या वतीने करण्यात आला. ज्या व्यक्तीचे आपल्याला नावही माहीत नाही त्याला आपण जातीवरून कशी काय शिवीगाळ करू, असा सवाल डॉ. लहाने यांच्या वतीने अ‍ॅड्. अशोक मुंदरगी यांनी केला. न्यायालयानेही त्याची गंभीर दखल घेत याच प्रश्नाबाबत सरकारी वकिलांकडे विचारणाही केली.
मात्र डॉ. लहाने यांनी उच्च न्यायालयाऐवजी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करायला हवा, असे न्यायालयाने स्पष्ट केल्यावर तसे न करण्यामागील कारण अ‍ॅड्. मुंदरगी यांनी सांगितले. एफआयआरची प्रत उपलब्ध न झाल्याने आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करताना ती बंधनकारक असल्यानेच डॉ. लहाने यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे अ‍ॅड. मुंदरगी यांनी स्पष्ट केले. तसेच आपल्याकडे आता एफआयआरची प्रतही उपलब्ध झाल्याने न्यायालयाने केलेल्या सूचनेप्रमाणे सत्र न्यायालयात मंगळवारीच अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करू, असे अ‍ॅड्. मुंदरगी यांनी सांगितल्यावर न्यायालयाने डॉ. लहाने यांना २० फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला.