डेंग्यूच्या डंखाने जेरीला आलेल्या मुंबईकरांना सोमवारपासून उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. कडक उन्हात पाच दहा मिनिटे घालवल्यावर फुटणाऱ्या घामामुळे मुंबईकर कासावीस झाले आहेत. यासाठी बर्फ, थंडगार पेय, आइस्क्रीमचा माराही सुरू झाला आहे. मात्र, उन्हापासून वाचण्यासाठी केल्या जाणाऱ्या या वरवरच्या उपायांपासूनही चार हात लांब राहण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.
मुंबईत ऋतुबदलाला सुरुवात झाली असून सकाळपासून वाढत जाणारा उष्मा, या उकाडय़ात फुटणारा घाम, दुपारनंतर होणारी ढगांची दाटी आणि रात्री विजांच्या कडकडाटासह पडणारा पाऊस असे वातावरणाचे तिहेरी रंग सध्या मुंबईकर अनुभवत आहेत. उन्हाळा आला की पावसाळा अजूनही आहे, अशी शंका घ्यायला लावणारा हा ऋतू स्थित्यंतराचा काळ विषाणूंसाठी एकदम पोषक असतो. हवेवाटे, पाण्यावाटे पसरणाऱ्या विषाणूंसाठी हे सुगीचे दिवस असतात. त्यातच उन्हापासून सुटका करून घेण्याच्या नावाखाली थंडगार पाण्याचा शरीरात मारा करणाऱ्यांवर ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असे म्हणण्याची वेळ येते.
उन्हाचा त्रास होत असला तरी टोपी, छत्री घेऊन बाहेर पडण्याचे अनेक जण टाळतात. मुंबईच्या दमट हवेत उष्माघाताचा धोका कमी असला तरी चक्कर येणे, बेशुद्ध पडण्याचे प्रकार होतात. पुरेसे पाणी पिणे, किलगड, टरबूज यांसारखी फळे खाणे हा त्यावरचा उपाय आहे. मात्र शीतपेय तसेच रस्त्यांवरील िलबू सरबत, उघडय़ावरील फळे खाल्ल्याने विषाणूंचा संसर्ग होऊन ताप-खोकला तसेच पोटदुखीला आयतेच आमंत्रण मिळते. पुरेसा आराम, योग्य आहार आणि पाणी यामुळे हा संसर्गाचा धोका कमी करता येतो. ताप-सर्दी-खोकला हे आजार काही दिवसांत बरे होतात. मात्र खूप ताप आल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.
डोळे येण्याची साथ
सर्दी-खोकल्यासोबतच या काळात विषाणुसंसर्गामुळे डोळे येण्याची साथ येते. डोळ्यांचा कोरडेपणा कमी झाल्याने संसर्गाची शक्यता वाढते. त्यामुळे डोळे कोरडे होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. शरीरात पाण्याचे प्रमाण पुरेसे ठेवणे तसेच वाटीत पाणी घेऊन त्यात डोळ्यांची उघडझाप केल्यास संसर्गाला आळा बसू शकेल. तरीही संसर्ग झाल्यास तो दुसऱ्या डोळ्याला होऊ नये तसेच इतरांना होऊ नये याची काळजी घ्यावी. डोळ्याला सतत हात लावू नये. तेच हात दुसऱ्या डोळ्याला लावू नये. स्वत:चा रुमाल, कपडे, हात यांच्या माध्यमातून इतरांना होणारा संपर्क टाळता येईल.

हे करा
’ सध्या तापमान ३७ अंश सेल्सिअसदरम्यान आहे. त्यामुळे दुपारच्या उन्हात शक्यतो बाहेर पडू नका
’ बाहेर पडणे गरजेचे असल्यास छत्री, टोपी, सनग्लास यांचा वापर करा.
’ सोबत पाणी असू द्या. नियमितपणे पाणी प्या. घशाला कोरड पडली की गार पाणी प्यावेसे वाटते, त्यापेक्षा थोडय़ा थोडय़ा वेळाने उकळून गार केलेले साधे पाणी प्यायले तर कंठशोष पडणार नाही.
’ थंड पाण्याने किंवा शीतपेय, आइस्क्रीम यांनी तात्पुरते बरे वाटत असले तरी त्यामुळे घशाजवळ सर्दी-खोकल्याच्या विषाणूंना जागा थाटण्यासाठी आयतीच संधी मिळते, हे लक्षात घ्या. या विषाणूंमुळे जुलाब, पोटदुखीही होते.

आहार हलका ठेवा
पावसाळा सरून उन्हाळा सुरू होतो, की आपण लगेचच उन्हाळ्याला अनुरूप असा आहार करू लागतो; परंतु हे करणे घातक असते. आहारात बदल हा हळूहळू करावा लागतो. आहारविहारात लगेचच झालेला बदल आरोग्य आणखी बिघडवून टाकतो. उन्हाळ्यात लगेचच थंड पाणी, शीतपेये, आइस्क्रीम, गार पाण्याची आंघोळ कितीही सुखकारक वाटत असली तरी ते शरीराच्या तापमान नियंत्रण यंत्रणेमध्ये बिघाड करतात. आपली चयापचय क्रिया बिघडते. अशा वेळी रोगजंतूंचा शरीरातील प्रवेश सुलभ होतो. त्यांची वाढ आणि प्रसारही झपाटय़ाने होतो. म्हणून ऋतुसंधी काळात आपले आरोग्य सांभाळण्यासाठी आहार शक्य तितका हलका ठेवा.
डॉ. अश्विन सावंत