मुंबईत मद्याची होम डिलिव्हरी सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे. मुंबई महापालिका आयुक्तांनी यासंदर्भातले आदेश दिले आहेत. उद्यापासून म्हणजेच शनिवारपासून घरपोच मद्य पोहचवण्यास विक्रेत्यांना संमती देण्यात आली आहे. कंटेन्मेट झोन अर्थात करोना प्रतिबंधित क्षेत्रात मात्र मद्य मिळणार नाही असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नसल्याने वाईन शॉप्स बंदच राहतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ही विक्री करताना राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने घालून दिलेले निर्देश पाळणे बंधनकारक असणार आहे असंही मुंबईचे आयुक्त इकबालसिंग चहल यांनी म्हटलं आहे.

राज्य शासनाने Lockdown 4 मध्ये दिलेल्या इतर परवानग्यांमध्ये इतर कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. प्रतिबंधित क्षेत्रात टाळेबंदीची कठोर अमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे कंटेन्मेट झोन वगळता अन्यत्र मद्याची घरपोच विक्री करता येईल. मद्यविक्रीसाठी ऑनलाइन संमती देण्यात आली असली तरीही वाईन शॉप्स उघडण्याची संमती देण्यात आलेली नाही. वाईन शॉप्स उघडल्यानंतर खरेदीसाठी झुंबड उडाल्याचं चित्र मुंबईत दिसून आलं होतं. त्यामुळे हा निर्णय तातडीने मागे घेण्यात आला होता. आता घरपोच मद्यविक्रीला संमती देण्यात आली आहे.