मंत्री नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई : अमली पदार्थ प्रकरणात आर्यन खान व अरबाज मर्चंट याच्या अटके च्या वेळी के .पी. गोसावी व भाजपचे पदाधिकारी मनीष भानुशाली हे दोघे उपस्थित होते व त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाशी (एनसीबी) संबंध काय आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते  व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत के ला. 

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करताना ज्या व्यक्तींची छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसिद्ध झाली आहेत, त्यातील के.पी.गोसावी नावाची व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नसल्याचे खुद्द एनसीबीने स्पष्ट के ले आहे. तसेच अरबाजला अटक करणारा मनीष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असून तोही एनसीबीचा अधिकारी नसल्याचे समोर आले आहे. मग या दोघांनी कोणत्या अधिकारात आर्यन व अरबाजला अटक केली, याचा खुलासा एनसीबीने केला पाहिजे, अशी मागणी मलिक यांनी के ली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केंद्रीय यंत्रणांनी अटकेचे अधिकार दिले आहेत का, असा सवाल त्यांनी केला.

एनसीबी कारवाईशी संबंध नाही – भाजपचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी विभागाने (एनसीबी) केलेल्या कारवाईशी भाजपचा कोणताही संबंध नसून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला तुरुंगवास घडल्याने आलेल्या वैफल्यातून त्यांनी हे आरोप केले असल्याचे प्रत्युत्तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी  दिले.

दरम्यान, मनीष भानुशाली यांनी भाजपशी आपला २०१२ नंतर कोणताही संबंध नसल्याचे आणि एनसीबीच्या कारवाईत सहभाग नसल्याचे प्रसिद्धीमाध्यमांपुढे स्पष्ट केले. अमली पदार्थांमुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होते. या पार्टीबाबत माहिती मिळाल्यावर ती एनसीबीला दिली होती. मी कारवाईसाठी नाही, तर जबाब देण्यासाठी एनसीबीकडे गेलो होतो, असा दावा भानुशाली यांनी केला.