समाजपुरुषाकडून मिळालेल्या प्रेमाची मोजदाद करता येणार नाही. या दोघांच्याही प्रती मी शतश: ऋणी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी शनिवारी येथे केले.
कर्णिक यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या सभागृहात कोकण मराठी साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या समारंभात सत्कार सोहळ्याला उत्तर देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर हे तर ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर आणि ज्येष्ठ समीक्षिका विजया राजाध्यक्ष प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. सर्व सार्वजनिक आणि शासकीय संस्थांच्या पदावरून आज आपण निवृत्त होत असल्याची घोषणाही कर्णिक यांनी केली. साळगावकर यांच्या हस्ते सन्मानपत्र, तर ठाकूर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. या वेळी व्यासपीठावर कर्णिक यांच्या पत्नी शुभदा याही उपस्थित होत्या.
आता कुठेतरी थांबायला पाहिजे, या जाणिवेतून विविध पदांवरून आपण स्वेच्छानिवृत्ती घेत आहोत. मात्र, साहित्य संस्कृती मंडळाचे जे प्रकल्प सध्या हाती घेतलेले आहेत ते पूर्ण झाल्यानंतर मंडळाच्या अध्यक्षपदाचाही मी राजीनामा देईन, असेही ते म्हणाले.
कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी सांगितले की, बरीचशी आत्मचरित्रे ही काहीतरी सांगण्यापेक्षा लपविण्यासाठीच असतात. मात्र मधु मंगेश यांनी ‘करूळचा मुलगा’ या आत्मचरित्रात प्रांजळपणे सर्व सांगितले आहे. आत्मचरित्र हा माणूस समजून घेण्यासाठीचा शोध आहे तो त्यांनी स्वत:पासून सुरू केला. ज्येष्ठ लेखिका व समीक्षिका राजाध्यक्ष म्हणाल्या की, मधु मंगेश यांच्या जीवनात संघर्षांचे, दु:खाचे अनेक प्रसंग आले. मात्र त्याचा परिणाम त्यांच्या मनावर, वृत्तीवर आणि वर्तनावर कधीही झाला नाही. आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन नेहमीच सकारात्मक राहिलेला आहे. अध्यक्षपदावरून बोलताना ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी कर्णिकांचा सत्कार सोहळा म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वती यांचा संगम असल्याचे सांगितले. सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांनी सांगितले की, आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने कसा जगावा याची सगळ्यात मोठी शाळा म्हणजे मधु मंगेश कर्णिक आहेत.
..तर सरस्वतीची उपासना केली पाहिजे
शब्द मोजून मापून वापरायचे असतील त्यांनी सरस्वतीची उपासना केली पाहिजे. मग तोंडातून वावगे शब्द निघत नाहीत आणि माफी मागायची वेळ येत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता साळगावकर यांनी आपल्या भाषणात त्यांना लगावला.