‘आयआयटी’च्या पदवीप्रदान समारंभात केंद्रीय मंत्री रमेश निशंक यांचे वक्तव्य

विज्ञानाच्या क्षेत्रात भारताने जगाचे नेतृत्व केले आहे. सुश्रृत हा जगातील पहिला शल्यचिकित्सक होता. ‘अणू’चा शोध चरक ऋषींनी लावला. संस्कृत ही जगातील एकमेव वैज्ञानिक भाषा असून संगणकासाठी संस्कृत सुयोग्य असल्याचे ‘नासा’नेही मान्य केले आहे,’ अशी विधाने मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आयआयटी मुंबईच्या पदवीप्रदान समारंभात शनिवारी केली.

आयआयटी, मुंबईच्या ५७ व्या पदवीप्रदान समारंभात निशंक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मात्र, त्यांच्या विधानांनी उपस्थितांच्या भुवया काहिशा उंचावल्या. ‘शिक्षणाबरोबर संस्कार आणि संस्कृती जपणे आवश्यक आहे. जगाला शिक्षणाची, ज्ञानाची दिशा भारताने दिली. विज्ञानाच्या क्षेत्रात भारताने कायम नेतृत्व केले आहे. पुढील पाच वर्षांत विश्वगुरू म्हणून पुन्हा एकदा स्थान मिळवण्याचे ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर्तमानाबरोबरच इतिहास लक्षात घेतला पाहिजे आणि भविष्याचा वेध घेतला पाहिजे,’ असे निशंक म्हणाले.

आर्यभट्टांचे योगदान आपल्याला विसरता येणार नाही. जगाला शून्याची संकल्पना भारताने दिली. सुश्रृत हा जगातील पहिला शल्यचिकित्सक होता. यापुढे जगात कोठेही नवीन रुग्णालय सुरू होत असेल तर सर्वात आधी आयुष चिकित्सा पद्धतींचा विभाग सुरू केला जातो. नागार्जून यांनी रसायनशास्त्राची ओळख जगाला करून दिली, अशी विधाने निशंक यांनी केली.

संस्कृत ही जगातील एकमेव वैज्ञानिक भाषा आहे. जे बोलले जाते तेच या भाषेत लिहिले जाते. भविष्यात संगणकासाठी संस्कृत वापरली जाईल असे ‘नासा’नेही मान्य केले आहे. भविष्यात संगणक टिकणार असेल तर तो फक्त संस्कृ तच्या आधारेच टिकू शकेल, असे भाकीतही मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी केले. जगाला अणू ही संकल्पना जगाला चरक ऋषींनी दिली. आपल्याकडे जे आहे ते आपण जगाला का सांगायचे नाही? आपली परंपरा आपणे पुढे नेली पाहिजे, असेही ते म्हणाले.

नीलकेणी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’

या समारंभात इन्फोसिसचे अध्यक्ष नंदन नीलकेणी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही सन्माननीय पदवी देण्यात आली. नीलकेणी यांनी आयआयटीमधील त्यांचे शिक्षण, वास्तव्य याबाबतच्या आठवणींना उजाळा दिला. यंदा आयआयटी मुंबईच्या जवळपास साडेचारशे विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांतील पीएच.डी देण्यात आली. यावेळी आयआयटी मुंबईचे संचालक डॉ. शुभाषिश चौधरी, विविध विभागांचे अधिष्ठाता उपस्थित होते.