scorecardresearch

पवई आयआयटी येथील विद्यार्थ्यांची आत्महत्या

मानसिक तणावामुळे हा विद्यार्थी वैद्यकीय उपचार घेत असल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे

मुंबई: पवई आयआयटीमध्ये शिक्षण घेत असलेल्या २६ वर्षीय विद्यार्थ्यांने सोमवारी पहाटे वसतिगृहाच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. मानसिक तणावामुळे हा विद्यार्थी वैद्यकीय उपचार घेत असल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

दर्शन मालवीय असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. ‘आपल्या मृत्यूसाठी कोणालाही कारणीभूत ठरवू नये’, असा संदेश वसतिगृहाच्या फळय़ावर लिहून या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. वसतिगृहाच्या सुरक्षारक्षकाने या विद्यार्थ्यांला सर्वप्रथम रक्तबंबाळ अवस्थेत पाहिले. त्याने तात्काळ हा प्रकार त्याच्या वरिष्ठांना कळविला. त्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर या विद्यार्थ्यांला तात्काळ घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, याप्रकरणी पवई पोलिसांनी मृत्यूची नोंद केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत यांनी दिली.

हा विद्यार्थी मूळचा मध्य प्रदेशातील आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून तो आयआयटी, पवईमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत होता. मुलाच्या पालकांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर दुपारी त्याला भाऊ रुग्णालयात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी सुरक्षारक्षक व इतर व्यक्तींकडून पोलिसांनी प्रथम दर्शनी माहिती घेतली आहे. विद्यार्थ्यांने मृत्यूपूर्वी फळय़ावर संदेश लिहिला असल्यामुळे तो मानसिक तणावाखाली असल्याचे प्राथमिक तपासात वाटत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे हे प्रकरण आत्महत्येचेच असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे पोलिसाने सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Iit bombay student jumps to death from hostel building zws

ताज्या बातम्या