मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण मुंबईत आजपासून (३० मेपासून) ५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. येत्या ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. सातही धरणांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. महानगरपालिकेतर्फे ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यातही ही कपात लागू करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे. तसेच, या सात धरणांमध्ये आता केवळ १ लाख २१ हजार ४१९ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाने ओढ दिल्यास मुंबईकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मात्र, हवामान खात्याने मान्सूनबाबत सकारात्मक अंदाज वर्तविला आहे.

हेही वाचा…एमएचटी सीईटीपाठोपाठ आता बीए, बीएस्सी व बी.एडचे प्रश्न, उत्तरे आक्षेपासाठी उपलब्ध

दरम्यान, धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्याचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी पालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला असून सातही धरणांमध्ये केवळ ८.३९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी पाणीसाठा १४.४ टक्क्यांवर होता. या पाणीकपातीमुळे पूर्वीपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या परिसरातील नागरिकांच्या पाणी चिंतेत आणखी वाढ झाली आहे. उपलब्ध पाणीसाठ्यावर महानगरपालिका प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून दररोज नियोजनपूर्वक पाणीपुरवठा केला जात आहे. मुंबईकरांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा…प्रीपेड स्मार्ट मीटर भाडेकरूंसाठी अडचणीचे; दैनंदिन लघुसंदेश घरमालकांना जाणार असल्याने गोंधळाची शक्यता

दरम्यान, पालिका प्रशासनातर्फे येत्या ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांनाही पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पालिकेने लागू केलेल्या पाणीकपातीचा या भागांनाही फटका बसणार आहे. समाधानकारक पर्जन्यमान होऊन धरणांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणीकपात कायम राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा…दक्षिण मुंबईतील काही भागात ३ व ४ जून दरम्यान पाणीकपात

मागील वर्षातील ३० मे रोजीचा पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

वर्ष पाणीसाठा
२०२४ – १२१४१९
२०२३ – १८८७५६
२०२२ – २६३५०७

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai five percent water cut implements amid decreasing dam levels ten percent cut from 5 june mumbai print news psg
Show comments