देशातील उच्चशिक्षणासाठी पात्र वयोगटातील प्रत्यक्षात उच्चशिक्षण घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण (ग्रॉस एन्रोलमेंट रेशो – जीईआर) यंदा एका टक्क्याने वाढले असून २६.३ टक्के विद्यार्थी उच्चशिक्षण घेत आहेत. भारतात शिक्षणासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांचे प्रमाणही गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढले आहे.

मनुष्यबळ विकाल मंत्रालयाकडून दरवर्षी अखिल भारतीय उच्चशिक्षण सर्वेक्षण केले जाते. भारत उच्चशिक्षणात कुठे आहे याचे चित्र या सर्वेक्षणातून समोर येते. उच्चशिक्षण घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण, शिक्षकांची संख्या, सुविधा, परदेशी विद्यार्थ्यांचे प्रमाण, विद्यापीठांची संख्या, महाविद्यालयांची संख्या, विद्यार्थ्यांचा विषयानुरूप कल अशा पातळ्यांवर हे सर्वेक्षण केले जाते. गेल्या शैक्षणिक वर्षांचा (२०१८-१९) अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार उच्चशिक्षण घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण साधारण १ टक्क्याने वाढले आहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांत भारताचा जीईआर २५.३ टक्के होता. आता तो २६.३ टक्के झाला आहे. महाराष्ट्रातील प्रमाणही वाढले असून देशाच्या सरासरीपेक्षा महाराष्ट्रातील उच्चशिक्षणाचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्राचा जीईआर ३० टक्के आहे.

परदेशी विद्यार्थ्यांची संख्या वाढली

आंतरराष्ट्रीय मानांकने मिळवण्यासाठी देशातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या हा एक महत्वाचा निकष असतो. २०१७-१८ च्या तुलनेत भारतात शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या गेल्यावर्षी वाढली आहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांत ४६ हजार १४४ परदेशी विद्यार्थी भारतात शिक्षण घेत होते. गेल्यावर्षी ही संख्या ४७ हजार४२७ झाली आहे.

देशात सर्वाधिक परदेशी विद्यार्थी (१० हजार २३) कर्नाटकमध्ये आहेत. परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र असून राज्यात ५ हजार ३ परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. देशभरातील परदेशी विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी हे नेपाळ, तर त्यानंतर अफगाणिस्तानमधून आलेले आहेत. सध्या साधारण दीड हजार विद्यार्थी अमेरिकेतील आहेत. परदेशी विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल हा तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाकडे आहे.