scorecardresearch

साखरेचे विक्रमी उत्पादन ; ३४२ लाख मेट्रिक टन : देशभरात अद्यापही २१९ कारखान्यांत उत्पादन सुरूच

गेल्या वर्षी संपूर्ण साखर हंगामात एकूण ३११ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले होते.

मुंबई : ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याने यंदा देशात विक्रमी ३४२ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आह़े  गेल्या वर्षीच्या साखर उत्पादनापेक्षा हे प्रमाण १४ टक्के जास्त आहे. विशेष म्हणजे अजूनही देशातील ५२० पैकी २१९ साखर कारखाने सुरूच असल्याने साखर उत्पादन ३५५ लाख मेट्रिक टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यंदा साखर निर्यातही ९५ लाख मेट्रिक टनांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

देशात २०१७-१८ मध्ये ३१२ लाख मेट्रिक टन, २०१८-१९ मध्ये ३२२ लाख मेट्रिक टन तर २०१९-२० मध्ये २५९ लाख मेट्रिक टन साखरचे उत्पादन झाले होते. यंदा देशभरात ५२० साखर कारखान्यांनी उत्पादन घेतले. एरवी मार्चपर्यंत साखर कारखान्यांचे गाळप पूर्ण होते. पण, उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात झाल्याने आता मे महिना सुरू झाला तरी देशातील २१९ साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळप व साखर उत्पादन सुरूच आहे. मागच्या वर्षी याच काळात १०६ साखर कारखाने सुरू होते. यंदा त्या तुलनेत दुप्पट साखर कारखाने सुरू आहेत. मागील तीन वर्षांचा विचार करता २०१७-१८ मध्ये एप्रिलअखेपर्यंत ११० साखर कारखाने सुरू होते. २०१८-१९ मध्ये ९० कारखाने सुरू होते. तर २०१९-२० मध्ये ११२ साखर कारखाने सुरू होते.

गेल्या वर्षी संपूर्ण साखर हंगामात एकूण ३११ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले होते. यंदा आतापर्यंत झालेले ३४२ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन आणि अजूनही २१९ साखर कारखाने सुरूच असल्याचे लक्षात घेतले तर एकूण ३५५ लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. यात जवळपास ३५ लाख मेट्रिक टन साखर होईल इतका रस आधीच इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्यात आला आहे हे लक्षात घेतले तर यंदाच्या विक्रमी उत्पादनाची कल्पना येईल, असे राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले.

देशात विक्रमी साखर उत्पादन होत असताना इथेनॉल निर्मितीचे वाढलेले प्रमाण आणि साखर निर्यातीत झालेल्या वाढीमुळे साखर उद्योगास मोठा हातभार लागला आहे. आतापर्यंत देशभरात ८५ लाख मेट्रिक टन साखरेचे निर्यात करार झाले असून त्यापैकी ६५ ते ७० लाख मेट्रिक टन साखर निर्यातीसाठी रवाना झाली आहे. हंगामातील शिल्लक दिवस पाहता देशातील साखर निर्यातीचे प्रमाण आणखी १० लाख मेट्रिक टनांनी वाढून ते ९५ लाख टनांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

यापूर्वी २००७-०८ आणि २०१०-११ मध्ये विक्रमी साखर उत्पादन झाले होते. पण त्यावेळी दर कोसळले होते. यंदा इथेनॉल व साखर निर्यात या दोन गोष्टींमुळे साखरचे अर्थकारण कोसळलेले नाही, असे नाईकनवरे यांनी स्पष्ट केले. गेल्या दोन वर्षांत करोनाच्या टाळेबंदीमुळे व निर्बंधांमुळे उन्हाळय़ात शीतपेये व आइस्क्रीम व लग्नसराईसाठी, मिठायांसाठीची साखरेची मागणी घटली होती. यंदा निर्बंध नसल्याने शीतपेये, आइसक्रीम व लग्नसराईमुळे साखरेच्या मागणीत वाढ झाल्याचाही चांगला परिणाम झाला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

साखर निर्यातीतून ३० हजार कोटी 

देशातील ८५ लाख मेट्रिक टन साखरेचे निर्यात करार झाले असून हंगामात एकूण ९५ लाख मेट्रिक टन साखर निर्यात होण्याचा अंदाज आहे. भारतातून यंदा सर्वाधिक १५ टक्के साखर इंडोनेशिया, १० टक्के बांगलादेश आणि अफगाणिस्तान, सोमालिया, मलेशिया आदींना प्रत्येकी तीन टक्के साखर निर्यात झाली आहे. देशातील साखर कारखान्यांना निर्यातीमधून एकूण ३० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळण्याचा अंदाज असल्याचे प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India produced record 342 lakh metric tonnes of sugar this year zws

ताज्या बातम्या