सुभाष देशमुख, विष्णू सवरा, मुख्यमंत्र्यांनाही केले जाणार ‘लक्ष्य’

नोटाबंदीमुळे होत असलेले जनतेचे हाल, जिल्हा बँकांमध्ये व ग्रामीण भागात ठप्प झालेले आर्थिक व्यवहार, शेतकऱ्यांची कर्जमाफी, आदिवासी भागातील मुलांचे कुपोषण आदी मुद्दय़ांवरुन सोमवारपासून सुरु होत असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. नोटाबंदीविरोधात जनतेच्या बाजूने असलेल्या शिवसेनेच्या  ‘रोखठोक’ भूमिकेमुळे एकाकी भाजपची विरोधकांकडून कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था आणि काही वादग्रस्त निर्णयांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांकडून हल्लाबोल होईल. मात्र नगरपालिका निवडणूक निकालांमुळे ताकद दाखविलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेला काबूत ठेवून विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी व्यूहरचना केली आहे.

नोटाबंदीच्या मुद्दय़ावरुन संसदेत काँग्रेससह विरोधी पक्षांनी कोंडी करुन कामकाज रोखून धरले आहे, त्याच पध्दतीने  विधिमंडळातही काँग्रेससह विरोधीपक्ष व सत्ताधारी शिवसेनाही भाजपवर तुटून पडण्याची तयारी करीत आहे. संसदेप्रमाणेच विधिमंडळातही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिल्या दिवसापासून नोटाबंदीच्या मुद्दय़ावरुन कामकाज रोखण्याचा विचार करण्यात येत आहे.

नोटाबंदीमुळे बँकांकडे प्रचंड निधी उपलब्ध झाला असून कर्जे स्वस्त होण्याची शक्यता आहे. पण सध्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, नोटाबंदीचा फटका व मंदीमुळे मालाची पुरेशी खरेदी होत नसून कांदा,टोमॅटो व अन्य उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना कवडीमोल दर मिळत आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी विरोधकांची मागणी राहणार आहे. त्याचबरोबर उद्योगपती विजय मल्ल्यासह थकबाकीदार उद्योगपती व कंपन्यांना कर्जमाफी दिली जाते, तर बँकांकडे भरपूर निधी असल्याने आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, ही मागणी विरोधकांकडून रेटण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, बाळासाहेब थोरात, नारायण राणे या ज्येष्ठ नेत्यांमध्ये असलेली पक्षांतर्गत धुसफूस वाढत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातही मतभेद आहेत. त्यामुळे विरोधकांची एकजूट होऊ नये, असे मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रयत्न असतील.

भाजपकडून व्यूहरचना

विरोधकांना तोंड देण्यासाठी भाजपनेही व्यूहरचना केली आहे. काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, बाळासाहेब थोरात, नारायण राणे या ज्येष्ठ नेत्यांमध्ये असलेली पक्षांतर्गत धुसफुस वाढत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातही मतभेद आहेत. त्यामुळे विरोधकांची एकजूट होऊ नये, असे मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रयत्न असतील. शिवसेना सत्ताधारी विरोधकांच्या भूमिकेत असली तरी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून व योग्य ठिकाणी नाक दाबून शिवसेनेला काबूत ठेवण्याचे कसब दोन वर्षांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दाखविले आहे. त्यामुळे विरोधकांच्या कळपात शिवसेना सामील होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी भाजपने पावले टाकली आहेत.