मुंबई : जगभरात देशाला गौरवशाली बनवण्यासाठी चित्रपट महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. कोणत्याही दबावाशिवाय दुसऱ्या देशांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे सुप्त सामर्थ्य (सॉफ्ट पॉवर) भारतीय चित्रपटांमध्ये आहे, अशी आशा केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केली.

‘भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद’ (आयसीसीआर) आणि ‘फ्लेम विद्यापीठा’तर्फे मुंबईत ‘भारतीय चित्रपट आणि सुप्त सामथ्र्य’ या विषयांवर दोनदिवसीय परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाच्या समारोपप्रसंगी दूरचित्र माध्यमातून संवाद साधताना अनुराग ठाकूर यांनी देशाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्यासाठी भारतीय चित्रपट कशा पद्धतीने मोलाची भूमिका बजावू शकतात याची सविस्तर मांडणी केली.

‘भारतीय चित्रपट आणि सुप्त सामथ्र्य’ या परिसंवादात्मक कार्यक्रमात देशातील विविध भागांतून ९५हून अधिक सदस्यांनी विविध चर्चासत्रांत भाग घेतला. भारतीय चित्रपट आणि आंतरराष्ट्रीय संबंधविषयक अभ्यासकांना एकत्र आणणे हा या परिसंवादाचा उद्देश होता. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांनी मंगळवारी या चर्चासत्राचे उद्घाटन केले. सुभाष घई, रूपा गांगुली, भारत बाला, अंबरीश मिश्रा, अरुणराजे पाटील, अशोक राणे, मीनाक्षी शेड्डे, मनोज मुंतशिर, परेश रावल आणि जीपी विजय कुमार आदी नामवंतांनी या दोनदिवसीय परिसंवादात पार पडलेल्या विविध सत्रांचे अध्यक्षस्थान भूषविले. या परिसंवादाच्या समारोपाच्या निमित्ताने बोलताना, एखाद्या संस्कृतीचे चित्रण हे कोणत्याही देशाच्या सूप्त सामर्थ्यांतील एक महत्त्वाचा घटक आहे.

भारतीय संस्कृतीत असलेल्या याच क्षमतेची भारतीय चित्रपट उद्योग आणि केंद्र सरकार यांना सर्वार्थाने जाणीव झाली आहे, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले. भारतीय चित्रपटांनी लॅटिन अमेरिका, दक्षिण कोरिया, चीन, जपान आदी देशांमध्ये  शिरकाव केला असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले