‘अखिल भारतीय ब्रूअर्स असोसिएशन’ची श्वेतपत्रिका जाहीर;
७% बीअर, ०.१% वाइन, तर ९२.९% दारूचे सेवन
जगभरातील देशांच्या तुलनेत बीअर सेवनात भारतीय पिछाडीवर असले तरी दारू रिचवण्यात भारतीय आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. ‘अखिल भारतीय ब्रूअर्स असोसिएशन’च्या श्वेतपत्रिकेत संकलित केलेल्या माहितीत ही बाब नमूद करण्यात आली आहे. देशात रोज मद्यप्राशन करणाऱ्यांमध्ये ७ टक्के बीअरचे, ०.१ टक्के वाइन, तर तब्बल ९२.९ टक्के दारूचे सेवन केले जाते. बीअरवर आकारण्यात येणाऱ्या विविध करांमुळे देशी दारू स्वस्तात उपलब्ध होत असल्याने दारूचे मोठय़ा प्रमाणात सेवन केले जात असल्याचे समोर आले आहे.
सध्या चीन, ब्राझील, अमेरिका आणि रशिया या देशांत बीअर आणि वाइनचे मोठय़ा प्रमाणात सेवन केले जाते, तर दारूचे सेवन बीअरच्या तुलनेत अगदीच कमी प्रमाणात केले जाते. मात्र देशात हेच प्रमाण अगदी उलट असल्याचे समोर आले आहे. चीनमध्ये मद्यप्राशन करणाऱ्या एकूण शंभर टक्क्यांपकी ८७ टक्के मद्यपी बीअरचे, १० टक्के दारूचे, ३ टक्के वाइनचे, ब्राझीलमध्ये ८४ टक्के बीअरचे, १२ टक्के दारूचे, ४ टक्के वाइनचे, अमेरिकेत ८३ टक्के बीअरचे, ७ टक्के दारूचे, १० टक्के वाइनचे आणि रशियामध्ये ७३ टक्के बीअरचे, १७ टक्के दारूचे, तर १० टक्के वाइनचे सेवन करतात. मात्र देशाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास भारतात ७ टक्के बीअरचे, ९२.९ टक्के दारूचे, तर ०.१ टक्के वाइनचे सेवन केले जात असल्याचे ‘अखिल भारतीय ब्रूअर्स असोसिएशन’च्या श्वेतपत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. यात मद्यपींकडून सर्वाधिक सेवन हे ताडी आणि देशी दारूचे केले जाते.
बीअर उत्पादनामुळे देशाच्या महसूलवाढीत मोठय़ा प्रमाणात हातभार लागतो. मात्र दारूपेक्षा बीअरवर आकारण्यात येणारे विविध कर अधिक असल्याने बीअरची किंमत अधिक होते. परिणामी बीअरचे सेवन कमी प्रमाणात केले जाते. याशिवाय सध्या देशात एक लिटर बीअर निर्मितीसाठी येणाऱ्या खर्चाच्या चारपट अधिक पसे देऊन बीअर विकत घ्यावी लागत असल्याने बीअर विक्री कमी प्रमाणात होत असल्याचे श्वेतपत्रिकेत म्हटले आहे. याबाबत ‘अखिल भारतीय ब्रूअर्स असोसिएशन’शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian people love alcohol
First published on: 11-02-2016 at 03:14 IST