scorecardresearch

करोनाकाळात ७ महिन्यांत ८५०० बालकांचा मृत्यू

करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान म्हणजेच फेब्रुवारी ते ऑगस्टदरम्यान सात महिन्यांत ८ हजार ५८४ बालमृत्यू झाल्याची कबुली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

(संग्रहीत छायाचित्र)

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान म्हणजेच फेब्रुवारी ते ऑगस्टदरम्यान सात महिन्यांत ८ हजार ५८४ बालमृत्यू झाल्याची कबुली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी विधानसभेत दिली. सुधीर मुनगंटीवार, संजय केळकर यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात टोपे यांनी सात महिन्यांत ०-५ वयोगटांतील बालकांचा मोठय़ा प्रमाणात मृत्यू झाला असून बालमृत्यूचे प्रमाण हे औद्योगिक व आर्थिकदृष्टय़ा सबळ असणाऱ्या अशा नागपूरमध्ये सर्वाधिक ९२३, औरंगाबाद येथे ५७८, मुंबईत ७९२, पुण्यात ४२२ आणि नाशिकमध्ये ४१७ बालमृत्यूची नोंद झाल्याची माहिती दिली. करोनाकाळात आरोग्य सेवांचा बळकटीकरण करण्यासाठी सरकारने समिती गठित केली होती. या समितीच्या शिफारशीनुसार उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आजारी नवजात बालकांच्या उपचारासाठी विशेष कक्ष, नवजात शिशु स्थिरीकरण कक्ष, नवजात शिशू कोपरा, ग्राम बाल विकास केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील बाल उपचार केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्र, घरच्या घरी नवजात बालकांची काळजी, जननी सुरक्षा योजना अशा योजना-उपक्रम राबविले जात असल्याचेही टोपे यांनी सांगितले. 

उष्माघात उपचाराची सोय

 राज्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात होणाऱ्या रुग्णांवर उपचारासाठी राखीव खाटा ठेवण्यात आल्या आहेत तसेच आरोग्य विभागामार्फत जनजागृती केली जात असल्याचेही टोपे यांनी अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Infant deaths months second wave corona child mortality health minister rajesh tope child mortality rate ysh

ताज्या बातम्या