सीबीआयमधील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील भांडण चव्हाट्यावर आल्याने ही तपास यंत्रणा गेल्या दोन दिवसांपासून भलतीच चर्चेत आली आहे. दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना देशातील उच्चस्तरीय तपास यंत्रणांतील अंतर्गत वाद दुर्देवी असल्याचे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

सावंत म्हणाले, सीबीआय, सीव्हीसी, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग हे लोकशाहीचे स्तंभ आहेत, ते मजबूत राहणे गरजेचे आहे. मात्र, सध्या सीबीआयसारख्या उच्चस्तरीय यंत्रणेमधील उफाळून आलेला अंतर्गत वाद दुर्देवी आहे. तपास यंत्रणेतील प्रमुख अधिकारी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत ही गंभीर बाब असून याचे पडसाद लोकसभेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात उमटतील.

सुरुवातीला सीबीआयचे संचालक आणि उपसंचालक यांच्यामध्ये भ्रष्टाचार प्रकरणावरुन वाद निर्माण झाला. त्यानंतर हे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचले. मोदींना जाहीररित्या भांडणाऱ्या या दोन्ही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून दिले. त्याचबरोबर इतरही काही अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. यामुळे सध्या राजकीय वातावरण भलतेच तापले आहे. यावरुन केंद्र सरकारला विरोधकांकडून कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले जात आहे.

दरम्यान, सरकारच्यावतीने पत्रकार परिषदेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकारविरोधातील आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तसेच सीबीआय ही एक स्वयत्त संस्था असल्याने सीबीआयची चौकशी करण्याचा आम्हाला अधिकार नाही, असेही जेटली यांनी म्हटले आहे.