दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापत्राचा वाद परस्पर सामंजस्याने सोडवण्यास आपण तयार असल्याचे जयदेव यांनी बुधवारी उच्च न्यायालयात सांगितले, तर जयदेव यांनी बाळासाहेबांवर केलेले आरोप लक्षात घेता ही तडजोड होणे कठीण असल्याचे सांगत उद्धव यांनी तडजोडीस नकार दर्शविला, परंतु न्यायालयाच्या सूचनेनंतर या प्रकरणी पुनर्विचारासाठी वेळ देण्याची मागणीही उद्धव यांच्यातर्फे करण्यात आली.
हा वाद परस्पर सामंजस्याने सोडवावा, असा सल्ला न्यायालयाने मागच्या सुनावणीत ठाकरे बंधूंना दिला होता. मात्र उद्धव यांनी तडजोड होणे कठीण असल्याचे सांगितल्याने न्यायालयाने वाद परस्पर सामंजस्याने मिटविण्याबाबत दोन पर्याय उद्धव यांच्यापुढे ठेवले. त्यानुसार ठाकरे बंधूंची इन-कॅमेरा बैठक घडवून आणण्यात येऊन आणि त्यांच्या बैठकीतील तपशील उघड केला जाणार नाही, असे न्यायालयाने सुचवले. याव्यतिरिक्त ठाकरे बंधूंच्या विश्वासातील व्यक्तीच्या माध्यमातून हा वाद सोडविण्याचा पर्यायही न्यायालयाने सुचविला.
जर हा वाद परस्पर सामंजस्याने सोडविण्यात आला नाही, तर हे प्रकरण वर्षांनुवर्षे सुरूच राहील. एवढेच नव्हे, तर जयदेव आपला दावा सिद्ध करण्यात यशस्वी ठरले तर त्याचे कल्पना करता येऊ शकणार नाही, असे परिणाम होतील. हीच बाब उद्धव यांनी दावा जिंकल्यास जयदेव यांच्या बाबतीत होईल, याची जाणीव न्यायालयाने करून दिली. जयदेव यांना राजकीय महत्त्वाकांक्षा नाही. ते विशिष्ट स्वभावाचे व्यक्ती असून त्यातूनच त्यांनी हे आरोप केलेले आहेत, परंतु जर मनाचा मोठेपणा दाखवून हे प्रकरण मिटवले तर सगळ्यांचेच भल्याचे आहे. अन्यथा वर्षांनुवर्षे हे प्रकरण सुरूच राहील आणि निकालही अनपेक्षित येईल, असेही न्यायालयाने म्हटले. तसेच हा वाद किती जगजाहीर करणार आणि कशासाठी, असा सवालही केला. न्यायालयाच्या या सल्ल्यानंतर उद्धव यांनी वाद परस्पर सामंजस्याने सोडविण्याचा निर्णय घेण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली. ती न्यायालयाने मान्य करीत सुनावणी ६ जानेवारी रोजी ठेवली.