मुंबई : ‘आयआयटी’सह इतर केंद्रीय संस्थांमधील अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच जेईई मुख्य परीक्षा जवळपास दोन महिने पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचे पहिले सत्र जून तर दुसरे सत्र जुलैमध्ये होणार आहे.

परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्याची दखल घेऊन राष्ट्रीय चाचणी कक्षाने (एनटीए) परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेचे पहिले सत्र २१ एप्रिल ते ४  मे या कालावधीत होणार होते. सुधारित वेळापत्रकानुसार या परीक्षा आता २० ते २९ जून दरम्यान होईल. दुसऱ्या सत्रातील परीक्षा २४ ते २९  मे या कालावधीत घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. ही परीक्षा आता २१ ते ३० जुलै या कालावधीत होणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक एनटीएच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेचे (नीट) अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून यंदा देशातील ५४३ आणि परदेशातील १४ शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे.