कलवरी वर्गातील चौथी पाणबुडी ‘आयएनएस वेला’ आज एका शानदार कार्यक्रमाद्वारे नौदलाच्या सेवेत दाखल झाली. मुंबईत नौदल तळावर झालेल्या या कार्यक्रमात स्वतः नौदलाचे प्रमुख अ‍ॅडमिरल करमबिर सिंह जातीने उपस्थित होते. याआधी कलवरी वर्गातील तीन पाणबुड्या आयएनएस कलवरी, खंडेरी, करंज या नौदलात दाखल झाल्या आहेत.

आज सकाळी झालेल्या कार्यक्रमात आयएनएस वेला पाणबुडीवर नौदलाचा झेंडा सन्मानपूर्वक फडकवण्यात आला. हा क्षण कुठल्याही युद्धनौका किंवा पाणबुडीच्या बाबतीत महत्त्वाचा समजला जातो. आता थेट निवृत्त होतानाच नौदलाचा झेंडा हा पाणबुडीवरुन उतरवण्यात येईल. यानिमित्ताने नौदल प्रमुखांनी आयएनएस वेलाचे सारथ्य करणाऱ्या नौदल अधिकारी आणि नौसैनिकांशी संवाद साधला.

दरम्यान या कार्यक्रमांनतर झालेल्या पत्रकार परिषदमध्ये नौदल प्रमुखांनी काही प्रमुख गोष्टींवर भाष्य केले. “आयएनएस वेला ही सागरी सीमांचे संरक्षण करण्यात नौदलाची ताकद वाढवण्यात महत्त्वाची भुमिका बजावेल. कुठल्याही संकटाचा सामना करण्यास पाणबुडी सक्षम आहे. चीन आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. चीनकडून पाकिस्तानला जी मदत होत आहे यामुळे परिस्थिती बदलू शकते”, असं नौदलप्रमुखांनी स्पष्ट केलं. कलवरी वर्गातील पाणबुड्या नौदलात दाखल होत असल्याने Project 75 प्रकल्पाचा अर्धा टप्पा गाठला आहे, अशी प्रतिक्रिया नौदल प्रमुखांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या चाचण्या युद्धपातळीवर सुरु असून ऑगस्ट २०२२ मध्ये विक्रांत नौदलात दाखल होईल अशी माहिती नौदल प्रमुखांनी यावेळी दिली.

कलवरी वर्गातील पाणबुडी आयएनएस वेलाच्या बांधणीला २०१६ च्या सुमारास सुरुवात झाली. मे २०१९ मध्ये वेलाचे जलावतरण झाले आणि चाचण्यांना सुरुवात झाली. दोन वर्षांच्या कसून चाचण्यांनंतर वेला आता नौदलात झाली आहे. सुमारे १७०० टन वजनाच्या कलवरी वर्गातील पाणबुड्या या सलग ५० दिवस समुद्रात कार्यरत राहू शकतात आणि एक दमात १२ हजार किलोमीटर अंतर पार करु शकतात. अत्याधुनिक  Exocet क्षेपणास्त्र आणि पाणतीरांनी ( torpedo) या पाणबुड्या सज्ज आहेत. कलवरी वर्गातील पाणबुड्या या डिझेल-इलेक्ट्रिक प्रणालीवर चालतात आणि जगात सर्वोत्कृष्ठ म्हणून ओळखल्या जातात. या वर्गातील आणखी दोन पाणबुड्या लवकरच नौदलात दाखल होण्याच्या मार्गावर आहेत.