मुलगा फसला प्रेमाच्या सापळयात! फरार आई-वडिल पोहोचले तुरुंगात

चीट फंड घोटाळयात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आरोपीच्या मुलाला हनीट्रॅपमध्ये अडकवून मुख्य आरोपींना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले.

सौजन्य – मुंबई मिरर

चीट फंड घोटाळयात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आरोपीच्या मुलाला हनीट्रॅपमध्ये अडकवून मुख्य आरोपींना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. मुंबईतील कामाठीपुऱ्यातील नागरिकांनी दाखवलेल्या हुशारीमुळे मख्य आरोपी रामचंद्र चीलवेरी आणि त्याची पत्नी रुपा दोघे गजाआड झाले आहेत. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

आरोपी पती-पत्नीने कामाठीपुऱ्यात जवळपास ४०० जणांना १४ कोटी रुपयांना फसवलं. अनेकांनी आयुष्यभराची कमाई या चीट फंडमध्ये गुंतवली होती. दसऱ्यानंतर रामचंद्र आणि त्याची पत्नी रुपा दोघे बेपत्ता झाले. गुंतवणूकदारांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला पण दोघांचा काही थांगपत्ता लागत नव्हता. पोलिसांनाही ते सापडत नव्हते. अखेर फसलेल्या गुंतवणूकदारांना या जोडप्याचा मुलगा सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे समजले.

त्याचा या गुन्ह्यांशी काही संबंध नव्हता. त्यांनी एका मुलीला सर्व प्रकरण समजावून सांगितले व सोशल मीडियावरुन रामचंद्र-रुपाच्या मुलाबरोबर मैत्री करण्यासाठी राजी केले. सोशल मीडियावर दोघांची मैत्री झाल्यानंतर मुलाने त्या तरुणीबरोबर चॅटिंग सुरु केले. मुलाचा विश्वास बसल्यानंतर तो संबंधित तरुणीला विलेपार्ले येथील एका मॉलजवळच भेटण्यास तयार झाला. मंगळवारी जेव्हा तो संबंधित मुलीला भेटण्यासाठी आला तेव्हा फसलेल्या गुंतवणूकदारांनी त्याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी या मुलाला त्याच्या आई-वडिलांना फोन लावण्यास सांगितला. पोलीस या मुलाच्या आई-वडिलांसोबत बोलल्यानंतर आरोपी जोडपे स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले. रुपा चीट फंड कामाठीपूरा भागातील सर्वात जुना चीट फंड आहे. २००० सालापासून हा चीट फंड सुरु होता. या जोडप्याने ४०० गुंतवणूकदारांना जवळपास १४ कोटी रुपयांना फसवले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kamathipura chit fund scam victims catch accused couple son by honeytrap

ताज्या बातम्या