एप्रिल महिन्याच्या अखेरीस सलग चार दिवस सुट्टय़ा; एसटी, खासगी बस गाडय़ांचा पर्याय

एप्रिल महिन्याच्या अखेरीस आलेल्या सलग चार सुट्टय़ांमुळे कोकण, गोव्यापर्यंत जाणाऱ्या मेल-एक्सप्रेस गाडय़ा फुल्ल झाल्या आहेत. २८ एप्रिल ते १ मे या कालावधीतील सुट्टय़ांमुळे कोकणकन्या, तुतारी, जनशताब्दी एक्स्प्रेस, एलटीटी ते मडगाव डबलडेकर गाडींचे आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांना एसटी किंवा खासगी बस सेवांचा पर्याय निवडावा लागणार आहे.

गर्दीच्या काळात कोकणात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांना मोठय़ा प्रमाणात मागणी असते. लांब पल्ल्याच्या मार्गावर मेल-एक्स्प्रेस गाडय़ांचा प्रवास सुकर होत असल्याने प्रतीक्षा यादी असूनही अनेक जण या गाडय़ांतील प्रवासासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे प्रतीक्षा यादी बरीच वाढत जाते. एप्रिलच्या अखेरीस आणि मे-जून महिन्यांत तर शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्याने गावी जाण्यासाठी एकच गर्दी लांब पल्ल्याच्या गाडय़ांना होते.

या वेळी २८ एप्रिल हा चौथा शनिवार, त्यानंतर रविवार तर ३० एप्रिल बुद्ध पौर्णिमा आणि १ मे हे सुट्टीचे दिवस येतात.

या सलग चार सुट्टय़ांमुळे कोकण मार्गावरील गाडय़ांना मोठी मागणी आहे. २० एप्रिलपासूनच पुढे जनशताब्दी एक्स्प्रेसचे आरक्षण फुल्ल झाले असून प्रतीक्षा यादी २५० ते ४०० पर्यंत पोहोचली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या गाडीला विशेष डबा जोडून आणि १,८७० रुपये एवढे तिकीट शुल्क असूनही त्याला प्रतीक्षा यादी आल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.

वातानुकूलित डबल डेकर गाडीला प्रतिसाद नसल्याने रेल्वेकडून त्याचे डबे कमी करण्यात आले.

या सुट्टय़ांच्या दिवशीही डबल डेकर गाडीला चांगला प्रतिसाद मिळत असून १०० ते १५० पर्यंत प्रतीक्षा यादी लागली आहे.

त्याचप्रमाणे मँगलोर एक्स्प्रेससाठी २०० तर तुतारी एक्स्प्रेससाठी ४०० पर्यंत प्रतीक्षा यादी येत असून सुपरफास्ट तेजस गाडीलाही प्रतीक्षा यादी आहे.

वातानुकूलित डबल डेकरलाही प्रतिसाद

वातानुकूलित डबल डेकर गाडीला प्रतिसाद नसल्याने रेल्वेकडून त्याचे डबे कमी करण्यात आले. या सुट्टय़ांच्या दिवशीही डबल डेकर गाडीला चांगला प्रतिसाद मिळत असून १०० ते १५० पर्यंत प्रतीक्षा यादी लागली आहे. त्याचप्रमाणे मँगलोर एक्स्प्रेससाठी २०० तर तुतारी एक्स्प्रेससाठी ४०० पर्यंत प्रतीक्षा यादी येत असून सुपरफास्ट तेजस गाडीलाही प्रतीक्षा यादी आहे.