‘आषाढस्थ प्रथम दिवस’ साजरा करीत मंगळवारी कोसळलेल्या पावसाचा जोर बुधवारीही कायम होता. दोन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील जलपातळीत गेल्या काही वर्षांच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. काही दिवस असाच पाऊस पडला तर तलाव दुथडी भरून वाहतील, असा आशावाद जलविभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा क्षेत्रामध्ये दमदार पाऊस पडत आहे. बुधवारी सकाळी ६ वाजताच्या नोंदीनुसार या तलावांमध्ये एकूण ६ लाख २६ हजार ५६४ दशलक्ष लिटर जलसाठा उपलब्ध झाला आहे. गतवर्षी याच दिवशी तलावांमध्ये १ लाख ४२ हजार ०५० दशलक्ष लिटर इतके पाणी होते.