कुख्यात गुंड रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्याच्या बनावट चकमकी प्रकरणी सर्वच्या सर्व म्हणजेच २१ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निलंबित पोलीस अधिकारी प्रदीप सूर्यवंशीसह १३ पोलीसांचा समावेश आहे. मात्र, सत्र न्यायालयाने मागच्या शुक्रवारी ‘चकमकफेम’ पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली. कोणत्याही चकमकीप्रकरणी एकत्रितपणे पोलीसांना शिक्षा होण्याची मुंबईच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
लखनभैय्या याचे अपहरण करून त्याला ऑगस्ट २००६ मध्ये ठार केल्याचा आरोप ठेवून शर्मा यांच्यासह इतर आरोपी पोलिसांना जानेवारी २०१० मध्ये अटक करण्यात आली. तेव्हापासून हे सर्व पोलीस तुरुंगात आहेत. लखनभैय्या वर्सोव्याला येणार असल्याची टीप मिळाल्यावर पोलिसांनी चकमकीत त्याला ठार केले, असा पोलिसांचा दावा होता. लखनभैय्याचा भाऊ ऍड्‌. रामप्रसाद गुप्ता यांनी हा दावा फेटाळला होता. लखनभैय्याचे एन्काऊंटर होण्यापूर्वी सात तास आधी त्याला पोलिस घेऊन गेले होते, असे त्यांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत म्हटले होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर शर्मा व अन्य पाच जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakhan bhaiya encounter 21 convicted sentenced to life imprisonent
First published on: 12-07-2013 at 05:21 IST