सात जिल्ह्यांमध्ये रुग्ण अधिक; रुग्णसंसर्गाचा सरासरी दर २.४४ टक्के

मुंबई : राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, साप्ताहिक रुग्ण संसर्गाचा दर २.४४ टक्क्यांपर्यंत घटला आहे. मात्र पुणे, सातारा, सांगली, नगर, सोलापूर, उस्मानाबाद आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या अधिक आहे.

नंदुरबार जिल्ह्यात एकही करोना रुग्ण उपचाराधीन नाही. धुळे, वाशिम, यवतमाळ, भंडारा, वर्धा व गोंदिया या सहा जिल्ह्यांत उपचाराधीन रुग्णांची संख्या १० पेक्षाही कमी आहे. राज्यातील एक कोटी तेहतीस लाख सात हजार नागरिकांना करोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा देण्यात आलेल्या असून हा देशातील उच्चांक आहे.  सणासुदीच्या काळात करोना नियमांचे पालन करून काळजी घेण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत राज्याच्या करोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. रुग्णसंख्या व लसीकरणाबाबत आरोग्य विभागाने मंत्रिमंडळास सादरीकरण केले. करोना आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजना व नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले.

परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या १०० पेक्षा कमी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोल्हापूर, रत्नागिरी या शहरातील रुग्णवाढीचा दर हा चिंताजनक होता. आता या जिल्ह्यांचा साप्ताहिक सरासरी रुग्णवाढीचा दर २.४४ टक्केपेक्षाही कमी झाला आहे, हे दिलासादायक असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.  राज्यात आजपर्यंत पाच कोटी सात लाखांपेक्षा अधिक करोना प्रतिबंधक मात्रा नागरिकांना देण्यात आलेले आहेत.  राज्यातील ४५ पेक्षा अधिक वयाच्या ५० टक्के नागरिकांना किमान एक मात्रा देण्यात आली आहे. तर १८ ते ४४ वयोगटातील सुमारे २५ टक्के नागरिकांना किमान एक मात्रा देण्यात आली आहे. तसेच १४ ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी नऊ लाख चौसष्ट हजार नागरिकांचे करोना लसीकरण करून राज्याने उच्चांक नोंदविला आहे.

दरम्यान, करोना टाळेबंदी काळातील उर्वरित दूध भुकटी आणि बटर महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाला (महानंद) व्यवसायासाठी विक्री साठा (वर्किंग स्टॉक) म्हणून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.

विद्यार्थीनीकडून पारितोषिकाची रक्कम पूरग्रस्तांसाठी

औरंगाबादला सातवी इयत्तेत शिकणाऱ्या आदिती दीपक जाधव या मुलीने डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धेतली रौप्य पदकाची २००० रुपयांची पारितोषिकांची रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा केली आहे. तिने पाठविलेल्या मदतीचे व पत्राचे मंत्रिमंडळ बैठकीत कौतुक करण्यात आले.

राज्याची १७ ऑगस्टची करोना रुग्णस्थिती

आजपर्यंतचे एकूण रुग्ण –  ६४ लाख एक हजार २१३

बरे झालेले रुग्ण –  ६२ लाख एक हजार १६८

एकूण मृत्यू – एक लाख ३५ हजार २५५

उपचाराधीन रुग्ण  – ६१ हजार ३०६

रुग्ण बरे होण्याचा दर – ९६.८७ टक्के