मुंबईतील पदपथ अडवून बसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांचा कळवळा शरद राव यांना आला असून ‘अनधिकृत फेरीवाल्यांना परवाने मिळवून देणारच’, अशी भीमगर्जना राव यांनी केली आहे.
फेरीवाला धोरणामध्ये स्थानिकांना आरक्षण अथवा प्राधान्य देण्यात येणार नाही. मात्र सध्या परवान्याशिवाय व्यवसाय करीत असलेल्या फेरीवाल्यांना परवाने देण्याबाबत केंद्रीय शहर विकास मंत्री अजन माकन यांनी केलेल्या घोषणेची आठवण करून देत शरद राव म्हणाले की, राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार सध्या फेरीचा धंदा करणाऱ्यांनाच प्राधान्याने परवाने द्यावेत. यासाठी मुंबई हॉकर्स युनियनतर्फे महाराष्ट्रातील लहान-मोठय़ा शहरांमध्ये स्वाक्षरीची मोहीम राबविण्यात येईल. वेळ पडल्यास न्यायालयाचे दरवाजेही ठोठवण्यात येतील.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार आणि केंद्रीय फेरीवाला धोरणानुसार महापालिका कायदा आणि पोलीस कायद्यात बदल करावे लागतील. लोकसंख्येच्या अडीच टक्के म्हणजे मुंबईत तीन लाखांहून अधिक फेरीवाला परवाने द्यावे लागतील. फेरीवाले ज्या ठिकाणी व्यवसाय करीत आहेत, तेथून त्यांना हटविता येणार नाही, असे ते म्हणाले. येत्या ८ मार्च रोजी दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत  एल्फिन्स्टन रोड येथील कामगार क्रीडा केंद्रात आयोजित करण्यात येणाऱ्या फेरीवाल्यांच्या मेळाव्यात फेरीवाल्यांच्या आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येईल, असेही ते म्हणाले.