‘जीवनरेखा एक्स्प्रेस’कडून देशभरातील १२० प्रकल्पांना आरोग्य सुविधा

भारतीय रेल्वेचे सर्वदूर पसरलेले जाळे देशाच्या दुर्गम भागांमधील लोकांना उर्वरित देशासाठी जोडण्याचेच काम करीत नसून याच रेल्वेच्या जाळ्यामुळे अनेक लोकांचे प्राणही गेली २५ वर्षे वाचवले जात आहेत. इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशन या संस्थेने भारतीय रेल्वे आणि आरोग्य मंत्रालय यांच्या महत्त्वपूर्ण साहाय्याने जीवनरेखा एक्स्प्रेस सुरू केली आहे. या एक्स्प्रेसला शनिवारी २५ वर्षे पूर्ण होत असून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे मध्य व पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक, इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशनचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि रेल्वेचे अधिकारी यांच्या उपस्थितीत एक छोटेखानी समारंभ पार पडला. गेल्या २५ वर्षांत १२० प्रकल्पांमार्फत देशभरातील सहा लाखांहून अधिक लोकांवर ‘जीवनरेखा एक्स्प्रेस’ने उपचार केले आहेत.

देशभरातील अनेक दुर्गम भागांमध्ये आजही प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. हीच बाब ध्यानात घेऊन १९९१ मध्ये इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशनने भारतीय रेल्वे व आरोग्य मंत्रालयाच्या मदतीने देशात जीवनरेखा एक्स्प्रेस सुरू केली. भारतीय रेल्वेवर दुर्गम भागांमध्ये ही गाडी जाते. या गाडीत शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन ऑपरेशन थिएटर्स, रुग्णांची काळजी घेण्यासाठी दोन खोल्या, औषधांचा साठा आदी सोयीसुविधा आहेत. या गाडीत मोतीबिंदू, अस्थिविषयक अशा अनेक शस्त्रक्रिया पार पडल्या असून त्यामुळे दुर्गम भागांमधील अनेक रुग्णांना दिलासा मिळाला आहे.